दागिने पॉलीश करताय? सावधान! भांडी आणि दागिने पॉलीशच्या नावाने घातला जातोय गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 01:51 AM2019-10-27T01:51:03+5:302019-10-27T01:51:22+5:30

महिलेच्या अंगावर दागिने दिसले, की तुमचे दागिनेही पॉलीश करून देतो. त्यांच्यासमोरच काही दागिने पॉलीश केले जातात.

Polishing jewelry? Careful! | दागिने पॉलीश करताय? सावधान! भांडी आणि दागिने पॉलीशच्या नावाने घातला जातोय गंडा

दागिने पॉलीश करताय? सावधान! भांडी आणि दागिने पॉलीशच्या नावाने घातला जातोय गंडा

Next

सुनील पाटील 

जळगाव : घरी येऊन कोणी तुमची भांडी व दागिने पॉलिश करून देण्याचे सांगत असेल, तर वेळीच सावध व्हा.. कारण, पॉलिशच्या बहाण्याने महिलांना बोलण्यात गुंतवून ‘सोन्याच्या दागिन्यांना पॉलीश करून देतो,’ असे सांगून ग्रामीण व शहरी भागातील महिलांना भुरळ घालून सोन्याचे दागिने पळविण्याऱ्या टोळ्या राज्यात सक्रिय झाल्या आहेत.

जळगाव शहरात दोन दिवसांपूर्वीच अशी एक घटना घडली. भांडी पॉलीश करून देण्याच्या नावाखाली महिलेला गुंतवून पायातील चांदीचे
पैंजण लांबविण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्याआधीही शहरात अशा घटना घडल्या असून राज्यभर हे प्रकार सुरू आहेत. लाखो रुपयांचे दागिने काही मिनिटांत लांबविले जात आहेत. अशा अनेक घटना राज्यात सर्वत्र घडत असतात़

शक्यतो घरी आलेल्या व्यक्तीकडून भांडी असोत की दागिने, पॉलीश करूच नयेत. अनोळखी व्यक्तीला घरात घेऊ नका. असा काही संशयास्पद प्रकार वाटला तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, त्याआधी जवळ किंवा शेजारच्या लोकांची मदत घ्यावी. जेणेकरून, अशा चोरट्यांना पकडणे शक्य होईल व या घटना टाळता येतील. -बापू रोहोम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

अशा आहेत काही ठळक घटना
पॉॅलीश करण्याच्या बहाण्याने हर्षा राजेंद्र जंजाळकर (४०, रा. मेहरुण, जळगाव) यांचे चांदीचे जोडवे लांबविण्यात आल्याचा प्रकार १५ ऑक्टोबर रोजी घडला होता. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने लोकांनी कैलास साह (२९, रा. मधेपूर, बिहार) याला पाठलाग करताना पकडले होते.गेल्या वर्षी ९ मे २०१८ रोजी मुक्ताईनगरातील एमएमआयटी महाविद्यालय परिसरात इंदूबाई गोविंद चौधरी (वय ६०) यांचे ८५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले होते. वंदना शरदचंद्र काबरा (६७, रा. पाचोरा) या वृद्धेचेही १८ जानेवारी २०१८ रोजी साडेचार लाखांचे दागिने चोरट्यांनी लांबविले. पॉलीशच्या बहाण्याने दोघांनी हे दागिने लांबविले. परप्रांतीय तरुणांचाच त्यात समावेश असल्याचे प्रकर्षाने दिसून आले.

काय खबरदारी घ्याल...? घरात कोणत्याही अनोळखी व्यक्तीला प्रवेश देऊ नये. भांडी पॉलीश करायची गरजच असेल, तर फक्त भांडीच काढून द्या.. मात्र, या वेळी घरात एक किंवा दोन पुरुष असावेत. दागिने शक्यतो बाहेर किंवा घरी आलेल्या व्यक्तीकडून पॉलीश करूच नका. सराफाच्या दुकानातच जाऊन दागिने पॉलीश करा तसेच भांडीही दुकानातच जाऊन पॉलीश करा. घरी आलेल्या व्यक्तीकडून भांडी व दागिने पॉलीश करूच नका. दरम्यान, अशी संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

औषध टाकण्याचाही फंडा
सोन्याच्या दागिन्यांना पॉलीश करून देतो, असे सांगून सीलबंद डब्यात दागिने टाकून त्यात काहीतरी औषध टाकले जाते. ‘पंधरा ते वीस मिनिटांनी डबा काढून घ्या व सोन्याची चमक बघा,’ असे सांगितले जाते. सांगितल्याप्रमाणे चमक पाहिली असता डब्यात दागिने नसल्याचे आढळून येते. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. अशी फसवेगिरी करणारे शक्यतो दुचाकीने येतात. या दुचाकीवर क्रमांक नसतो. असलाच तर बनावट असतो व शक्यतो दुचाकी घरापासून लांब अंतरावर पार्क केली जाते.

कशी आहे गुन्ह्याची पद्धत?
दुचाकीवरून किंवा चालत आलेल्या दोघा-तिघांकडून घराची टेहाळणी केली जाते. एकटी महिला किंवा वृद्धा अशा ज्या महिला घरात असतात तेथे हे संशयित जातात. घरात कोणीही पुरुष व तरुण मुलगा नसल्याची खात्री झाल्यावर या महिलांना हेरले जाते. सुरुवातील पाणी पिण्याचा बहाणा केला जातो. पाणी प्यायल्यानंतर ‘ताई, तुमच्या घरातील भांडी पॉलीश करायची आहेत का? कमी किमतीत भांडी पॉलीश करून देतो,’ असे सांगून त्यांना तयार केले जाते.

महिलेच्या अंगावर दागिने दिसले, की तुमचे दागिनेही पॉलीश करून देतो. त्यांच्यासमोरच काही दागिने पॉलीश केले जातात. नंतर घरातून गरम पाणी अथवा कोणतीही वस्तू आणायला लावतात. महिला घरात गेली, की चोरटे दागिने घेऊन पसार होतात. घरातून महिला बाहेर येते, तोपर्यंत चोरटे गायब झालेले असतात.

वशीकरणाचाही एक प्रकार आहे. महिलांना बोलण्यात गुंतवले जाते. त्यांच्यासमोरच भांडी पॉलीश करीत असताना अंगावरील दागिने केव्हा काढले जातात, हे त्या महिलेच्याही लक्षात येत नाही. हे भामटे निघून गेल्यानंतर पाच ते दहा मिनिटांनी महिलेच्या लक्षात ही गोष्ट येते. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

Web Title: Polishing jewelry? Careful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.