पार्किंगवर ताेडगा काढण्यासाठी धोरण; राज्य सरकारकडून ठोस पावले उचलण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 06:43 IST2025-04-11T06:43:18+5:302025-04-11T06:43:59+5:30

मुंबईसारख्या दाट वस्तीच्या भागात व्हर्टिकल पार्किंग, मल्टिलेव्हल पार्किंग अशा पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.

Policy to curb parking State government starts taking concrete steps | पार्किंगवर ताेडगा काढण्यासाठी धोरण; राज्य सरकारकडून ठोस पावले उचलण्यास सुरुवात

पार्किंगवर ताेडगा काढण्यासाठी धोरण; राज्य सरकारकडून ठोस पावले उचलण्यास सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना, राज्य सरकारने या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ठोस पावले उचलायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य परिवहन विभागाने शहरासाठी प्रभावी पार्किंग धोरण तयार करण्याच्या उद्देशाने काम सुरू केले असून, यासाठी क्रिझिल या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांत या संस्थेमार्फत विस्तृत अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिली.

परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पार्किंग धोरणाच्या संदर्भात अनेक कायदेशीर प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहेत. यामुळे नवीन धोरण तयार करताना या प्रकरणांचा सखोल अभ्यास करून, भविष्यात न्यायालयीन अडथळे येणार नाहीत याची खातरजमा केली जाणार आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार पार्किंगच्या गरजा वेगळ्या असतात. जसे की मुंबईसारख्या दाट वस्तीच्या भागात व्हर्टिकल पार्किंग, मल्टिलेव्हल पार्किंग अशा पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. तसेच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ‘स्मार्ट पार्किंग’ प्रणाली, मोबाइल ॲपद्वारे जागेची माहिती, ऑनलाइन बुकिंग यासारख्या आधुनिक सुविधादेखील समाविष्ट करण्याची शक्यता आहे.

याचा होणार अभ्यास
पार्किंग धोरण तयार करताना केवळ जागेची उपलब्धता एवढाच मुद्दा नाही, तर त्यामध्ये कायदेशीर बाबी, तंत्रज्ञानाचा वापर, सध्याच्या पार्किंग जागांचा वापर, नव्या जागांसाठीच्या शक्यता आणि भविष्यातील गरजांचाही विचार केला जाणार आहे. 
क्रिझिल या संस्थेला या सर्व पैलूंचा अभ्यास करण्याचे काम सोपवले आहे. या अभ्यासामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), मुंबई महापालिका, म्हाडा, एसआरए आणि इतर संस्थांसोबत समन्वय साधला जाणार आहे.

Web Title: Policy to curb parking State government starts taking concrete steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.