Police suspect Himalayan bridge has not been audited | हिमालय पुलाचे ऑडिट केलेच नसल्याचा पोलिसांना संशय
हिमालय पुलाचे ऑडिट केलेच नसल्याचा पोलिसांना संशय

मुंबई : सीएसएमटीतील कोसळलेल्या हिमालय पुलासंबंधित सर्व कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. यातूनच पुलाची तपासणी न करताच अहवाल पाठविल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यातही तपासणीसाठी नेमलेल्या ४ अभियंत्यांसह ९ जणांचा सहभाग समोर आला असून याबाबत स्ट्रक्चरल आॅडिटर नीरज कुमार देसाईने मौन बाळगले आहे. सोमवारी देसाईच्या कोठडीत २८ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
सीएसएमटी येथील पूल कोसळून १४ मार्चला ६ जणांचा बळी गेला, तर ३१ जण जखमी झाले. त्यानुसार, आझाद मैदान पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत, १८ मार्चला देसाईला अटक केली. प्राथमिक चौकशीत त्याच्या चुकीच्या अहवालामुळे पूल कोसळल्याचे समोर आले. सोमवारी त्याला वाढीव कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले. पुलासंबंधित कागदपत्रे २३ मार्चला पालिकेने पोलिसांना दिली. पालिकेने देसाईकडे या पुलासह ७६ पुलांच्या आॅडिटिंगची जबाबदारी सोपविली होती. त्यात, हिमालय पुलासाठी त्याने ४ अभियंत्यांसह आणखी ५ जणांची नेमणूक केल्याचे कागदपत्रांमध्ये आढळून आले. त्यांच्या कंपनीतील नेमक्या कोणत्या इंजिनीअर, ड्राफ्ट्समन किंवा अन्य तंत्रज्ञांनी तपासणी केली, तपासणी सुरू असताना त्यांनी नोंदवलेल्या कच्च्या नोंदी याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत. मात्र अद्याप याबाबत देसाई पोलिसांना माहिती देत नसल्याचे पोलिसांनी सोमवारी न्यायालयात सांगितले. देसाईच्या कंपनीने २०१६ मध्ये हिमालय पुलासह शहरातील ७६ पुलांची संरचनात्मक तपासणी सुरू केली. त्याचा अहवाल कंपनीने २०१८ मध्ये महापालिकेला दिला. या अहवालात हिमालय पूल धोकादायक नसून किरकोळ डागडुजीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. पुलाच्या तपासणीपूर्वी विविध परवानगी घेणे बंधनकारक असतात. त्या परवानग्याही त्याने घेतल्या नसल्याचे पोलिसांनी नमूद केले. तसेच याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.

जिओ डायनामिक्स चौकशीस गैरहजर
नॉल डीस्ट्रक्टिव्ह टेस्टसाठी देसाईने गुजरातच्या जिओ डायनामिक्स नावाच्या कंपनीची नेमणूक केली होती. त्यांना चौकशीसाठी बोलावले असता ते अद्याप हजर झालेले नाहीत. देसाई आणि या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना समोरासमोर बसवून चौकशी करायची असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या वेळी पोलिसांच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र सूर्यवंशी यांनी युक्तिवाद केला.

कोण आहे नीरज कुमार देसाई?
नीरज कुमार देसाई हा अंधेरीच्या दिव्य प्रकाश इमारतीत राहतो. त्याच्या वडिलांनी सुरू केलेल्या प्रोफेसर डी. डी. देसाई असोसिएट इंजिनीअरिंग कन्सल्टंट अ‍ॅण्ड अ‍ॅनॅलिस्ट कंपनीचा तो मालक आहे. त्याच्यावर २२ डिसेंबर, २०१६ रोजी सीएसएमटी पुलाच्या आॅडिटिंगची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार २२ डिसेंबर, २०१६ ला त्याने पुलाचे आॅडिट केले.

पालिकाच जबाबदार असल्याचा युक्तिवाद
देसाई यांच्या वतीने युक्तिवाद करताना अ‍ॅड. रिझवान मर्चंट यांनी, यात पालिकाच जबाबदार असल्याचे सांगितले. देसाई यांनी २०१७ मध्ये पुलाच्या दुरुस्तीबाबतचा अहवाल पाठविला होता. पालिकेने त्याची डागडुजी करणे गरजेचे होते. मात्र पालिकेने त्याकडे कानाडोळा केला. त्यामुळेच पूल कोसळल्याचे त्यांनी नमूद केले आणि वाढीव कोठडीला नकार दिला. मात्र, दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने देसाईच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ केली आहे.

Web Title:  Police suspect Himalayan bridge has not been audited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.