अश्लील टीका-टिप्पणी पडेल महागात; ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 12:29 IST2025-03-13T12:29:44+5:302025-03-13T12:29:51+5:30
होळी, धूलिवंदनानिमित्त साध्या गणवेशातील पोलिसांचा ‘वॉच’

अश्लील टीका-टिप्पणी पडेल महागात; ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त
मुंबई : होळी, धूलिवंदनाचा सण आनंदात साजरा करता यावा, यासाठी मुंबई पोलिसांनी ११ हजार जणांचा फौजफाटा तैनात केला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी पादचाऱ्यांवर रंगाचे पाणी उडविणे, अश्लील टीका, टिप्पणी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
मुंबईत १२ ते १८ मार्चदरम्यान होळी साजरी करण्यात येणार आहे. या काळात नागरिकांना या सणाचा आनंद लुटता यावा, तसेच सार्वजनिक शांतता व सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
आज गुरुवारी होळी आणि उद्या शुक्रवारी धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. त्यात पोलिस दलाकडून वाहतूक विभागासह ७ अपर पोलिस आयुक्त, १९ पोलिस उपायुक्त, ५१ सहायक पोलिस आयुक्त यांच्यासह १,७६७ पोलिस अधिकारी व ९,१४५ पोलिस अंमलदार यांचा समावेश आहे. महत्त्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ प्लाटून, आरसीपी प्लाटून, क्यूआरटी, बीडीडीएस टीम, होमगार्ड्स
यांचा चोख बंदोबस्त असणार आहे.
... तर थेट कोठडीची हवा
अश्लील शब्द किंवा सार्वजनिक ठिकाणी घोषणा देणे किंवा अश्लील गाणी गाणे.
हावभाव किंवा नक्कल आणि चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचे, प्रदर्शन किंवा प्रसार करणे, ज्यामुळे कोणाचीही प्रतिष्ठा, सभ्यता किंवा नैतिकता दुखावली जाऊ शकते.
पादचाऱ्यांवर रंगाचे पाणी, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकण्यांवर मनाई आहे.
रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवपदार्थाने भरलेले फुगे तयार करणे किंवा फेकल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे.
प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार शिक्षा करण्यात येणार आहे. साध्या गणवेशातील पोलिस सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असणार आहे. मंगळवार, १८ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’विरोधात विशेष मोहीम
ठिकठिकाणी नाकाबंदी करत गर्दीच्या ठिकाणी गस्त व फिक्स पॉइंट बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन व ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नियमभंग करणाऱ्या आस्थापना व अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
मद्यपान करून वाहन चालवणारे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे, महिलांशी गैरवर्तवणूक करणारे व्यक्ती, अनधिकृत मद्यविक्री करणाऱ्या आस्थापना, अमली पदार्थ विक्री तसेच सेवन, यासारखी बेकायदा कृत्य करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.