दसरा मेळावे, देवी विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 08:27 IST2025-10-02T08:27:26+5:302025-10-02T08:27:44+5:30
शिवाजी पार्क व गोरेगाव येथील दसरा मेळावा, विजयादशमी व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्त असणार आहे.

दसरा मेळावे, देवी विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मुंबई : शिवाजी पार्क व गोरेगाव येथील दसरा मेळावा, विजयादशमी व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्त असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या संख्येने देवीमूर्तीच्या विसर्जन मिरवणुकांसह विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास मुंबई पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार आहे.
पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. उत्सव काळात ७अपर पोलिस आयुक्त, २६ पोलिस उपायुक्त, ५२ सहायक पोलिस आयुक्तांसह २,८९० पोलिस अधिकारी आणि १६,५५२ अंमलदार तैनात राहणार आहेत. याशिवाय अत्यावश्यक व महत्त्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट फोर्स तसेच होमगार्डही तैनात असणार आहेत.
नागरिकांना आवाहन
गर्दीच्या ठिकाणी पोलिसांना सहकार्य करा, संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती निदर्शनास पडल्यास त्वरित पोलिसांना कळवा. नियमांचे पालन करून विजयादशमी, नवरात्रोत्सव आनंदाने व शांततेत साजरा करा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केले आहे.