मुंबई हादरली! ५ वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून पनवेलमध्ये १.८० लाखांना विक्री; मावशी आणि मामासह ५ जणांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 18:31 IST2025-11-26T18:31:37+5:302025-11-26T18:31:37+5:30
मुंबईतील वाकोला येथून ५ वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली.

मुंबई हादरली! ५ वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून पनवेलमध्ये १.८० लाखांना विक्री; मावशी आणि मामासह ५ जणांना बेड्या
Mumbai Crime: मुंबईतील सांताक्रूझ पूर्व भागातून एका ५ वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून, तिला पनवेलमध्ये तब्बल १ लाख ८० हजार रुपयांना विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी एका जोडप्याला आणि मुलीचा मामा-मावशीसह एकूण पाच आरोपींना अटक केली आहे.
शनिवारी दुपारी १२.३० वाजता एका महिलेने वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलीचे प्रकरण असल्याने पोलिसांनी या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखले. "हा गुन्हा गंभीर आणि संवेदनशील असल्याने, आम्ही सलग दोन दिवस सात पथके नेमली. सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे एका संशयास्पद रिक्षा आणि चालकाला ओळखण्यात यश आले," अशी माहिती पोलिसांनी दिली.
मामा-मामीचा सहभाग
तपासात पोलिसांना कळले की, ती संशयास्पद रिक्षा पनवेल भागात चालते. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पहाटे २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान एक जोडपे त्या मुलीसोबत रिक्षातून प्रवास करताना दिसले. रिक्षाचा क्रमांक नसतानाही गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सांताक्रूझ पूर्व येथील रहिवासी असलेल्या रिक्षाचालक लतीफ अब्दुल मजीद शेख (५२) याला सोमवारी अटक केली.
शेखच्या चौकशीतून मोठा खुलासा झाला. या अपहरणामागे मुलीचा मामा लॉरेन्स निकल्स फर्नांडिस (४२) आणि मावशी मंगल दगडू जाधव (३८) यांचा सहभाग असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तातडीने त्यांचा माग काढला आणि पनवेलमधील विठ्ठलवाडीतून त्यांना अटक केली.
१.८० लाखांना चिमुकलीचा सौदा
मामा-मावशीने चौकशीत कबूल केले की, त्यांनी मुलीला करण मारुती सानस याला ९० हजार रुपयांना विकले होते. तांत्रिक तपासाच्या आधारे सानसला रायगडमधील नवीन पनवेल येथील उसरली बुद्रुक येथून पकडण्यात आले. सानसने कबूल केले की, त्याने मुलीला वृंदा विनेश चव्हाण (६०) आणि अंजली अजित कोरगावकर (५७) या दोघींना १ लाख ८० हजार रुपयांना विकले.
पोलिसांची यशस्वी सुटका
पोलीस पथकाने तातडीने चव्हाण यांच्या पनवेल येथील निवासस्थानी शोध घेतला. मंगळवारी पोलिसांनी चिमुकलीची सुटका केली आणि तिला सुखरूप वाकोला पोलीस ठाण्यात तिच्या आईच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पोलिसांनी लतीफ अब्दुल मजीद शेख, लॉरेन्स निकल्स फर्नांडिस, मंगल दगडू जाधव, करण मारुती सानस, वृंदा विनेश चव्हाण आणि अंजली अजित कोरगावकर या पाच आरोपींना अटक केली आहे.