मुंबई - सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी अटक केलेल्या बांगलादेशी व्यक्तीच्या चेहऱ्याची ओळख पटवायची आहे. सीसीटीव्ही चित्रणात दिसणारी व्यक्ती व अटक आरोपीच आहे का? याचा तपास करायचा आहे, अशी माहिती पोलिसांनी वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाला शुक्रवारी दिली.
पोलिसांनी शरीफुल इस्लाम शेहजाद मोहम्मद रोहिला आमीन फकीर याला शुक्रवारी पोलिसांनी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. यावेळी तपासात प्रगती असली तरी या प्रकरणातील महत्त्वाच्या बाबींवर आरोपीची अधिक चौकशी करायची आहे. सैफ अली खानच्या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेली व्यक्ती आणि अटक केलेली व्यक्ती एकच आहे का? याची पडताळणी करायची आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. गुन्ह्याचे स्वरूप आणि तपास पाहता, आरोपीच्या पोलिस कोठडीत २९ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात येत आहे, असे न्यायालयाने म्हटले.
न्यायालयातील युक्तिवादसीसीटीव्हीमधील व्यक्ती आणि पोलिसांनी अटक केलेली बांगलादेशी व्यक्ती एक नसल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात केला. मात्र, पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, फकीरने सैफच्या घरी जाताना जे बूट घातले होते, ते अद्याप सापडले नाहीत. त्याच्या पायाचे ठसे आणि सैफच्या घरी सापडलेले पायाचे ठसे एकच आहेत का? याबाबतीतही तपास करायचा आहे. तसेच आरोपीकडून बांगलादेशचा वाहन परवाना जप्त केला आहे. त्याला भारतात विजय दास म्हणून वास्तव्य करण्यासाठी खोटे आधार आणि पॅनकार्ड कोणी बनवून दिले, याचाही तपास करायचा आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. तर पोलिस कोठडी वाढविण्याच्या पोलिसांच्या विनंतीला आरोपीच्या वकिलांनी विरोध केला. या घटनेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले.