लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भारत-पाकिस्तान दरम्यान तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणत्याही प्रकारचे फटाके, रॉकेट्स उडवू नयेत, असे आदेश मुंबई पोलिसांनी शनिवारी जारी केले. हे आदेश ११ मे ते ९ जूनपर्यंत लागू असतील.
शनिवारी संध्याकाळी भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाल्याने तणाव निवळेल, असा अंदाज होता. मात्र, पाकिस्तानने अवघ्या तीन तासांत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. अशा वेळी फटाक्यांच्या आवाजाने किंवा एरियल फटाक्यांमुळे अफवा पसरू शकतात आणि घबराट निर्माण होऊ शकते. त्यामुळे ही बंदी घालण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
अभियान विभागाचे उपायुक्त अकबर पठाण यांनी हे आदेश जारी केले असून, त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला ११ मेपासून ९ जूनपर्यंत शहरात फटाके, राॅकेटस् उडवण्यास किंवा फेकण्यास बंदी घालण्यात आली आहे.
सायबर हल्ल्यात आता सर्वसामान्यांना लक्ष्य
सीमेपलीकडून आता भारतावरील सायबर हल्ल्यात वाढ झाली असून, शासकीय व खासगी आस्थापना, संवेदनशील प्रकल्पांसोबत सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या सायबर विभागाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सीमेपलीकडील संघटित हॅकर टोळ्यांनी आता मालवेअर संक्रमित फाईलचा प्रसारही सुरू केला आहे. हा धोका टाळण्यासाठी अज्ञात स्रोतांकडून आलेल्या लिंक, संलग्न फाइल उघडण्यापूर्वी ती पाठवणाऱ्या व्यक्ती, समुहाची ओळख तपासावी.
अद्ययावत अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचा वापर, नियमित प्रणाली तपासणी, सुरक्षित लॉग इन पद्धती आणि द्विस्तरीय प्रमाणीकरण याचे कठोर पालन करणे आवश्यक आहे, अशी सूचना सायबर विभागाने जारी केली आहे.