Join us

विधानसभेच्या आचारसंहितेची चाहूल; नरेंद्र मोदी काम पूर्ण न झालेल्या पुलाचं उद्घाटन करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 18:54 IST

१२ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

राज्यभरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या पक्षांतरांमधून विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याचे संकेत मिळत आहेत. त्यासोबतच, सरकारच्या फारच 'गतिमान' झालेल्या कारभारातूनही त्याचा प्रत्यय येतोय. असं असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, ७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई आणि औरंगाबादमधील काही मोठ्या प्रकल्पांचं उद्घाटन, विकासकामांचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यापैकीच एक आहे, चुनाभट्टी ते बीकेसी हा पूल. या ओव्हरपासचं उद्घाटन ते करणार आहेत. परंतु, हा सोहळा काही तासांवर आलेला असतानाही, पुलाचं कामच अपूर्ण असल्याचं पाहायला मिळतंय.

१२ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. निवडणुकीची तारीख जाहीर होताच आचारसंहिता लागू होईल. म्हणजेच, आता जेमतेम आठ-दहा दिवस उरलेत. त्यामुळेच गेल्या महिन्याभरात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०, १२, १९, २५ असे चढत्या क्रमाने निर्णय घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा हीसुद्धा आचारसंहिता जवळ आल्याची चाहूलच आहे. 

(फोटोः सुशील कदम)

नरेंद्र मोदी औरंगाबादमध्ये मुंबई-दिल्ली औद्योगिक कॉरिडोर अंतर्गत उभारलेल्या ऑरिक सिटीमध्ये उद्योगनगरीचे उद्घाटन करतील. तसंच, महिला बचतगटांच्या मेळाव्यात त्यांचं भाषण होणार आहे. 

मुंबईत बीकेसीमध्ये मेट्रो भवनचे भूमिपूजन आणि मेट्रो मार्ग १०, ११ आणि १२ च्या कामाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार सकाळी ११ वाजता होईल. बऱ्याच काळापासून सुरू असलेलं चुनाभट्टी - बीकेसी ओव्हरपासचं काम अंतिम टप्प्यात आलं असलं, तरी ते पूर्ण झालेलं नाही. गेल्या काही दिवसांत एमएमआरडीएनं कामाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, पण पावसामुळे ते शक्य झालं नाही. त्यामुळे आता अपूर्ण पुलाचंच उद्घाटन मोदी करणार का, हे पाहावं लागेल. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीदेवेंद्र फडणवीस