पंतप्रधान आज मुंबईत, तीन लढाऊ युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करणार, मंत्र्यांचा क्लास घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 07:08 IST2025-01-15T05:35:42+5:302025-01-15T07:08:53+5:30
Narendra Modi : ५ डिसेंबरला महायुती सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत हजेरी लावली होती. त्यानंतर ते आता बुधवारी दुसऱ्यांदा मुंबईत येत आहेत.

पंतप्रधान आज मुंबईत, तीन लढाऊ युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करणार, मंत्र्यांचा क्लास घेणार
मुंबई : भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढविणाऱ्या तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, बुधवारी मुंबईत येत आहेत. मोदी हे महायुतीचे सर्व मंत्री व आमदारांचा क्लासही घेतील. दोन तासांच्या भेटीत पंतप्रधान सर्वांशी संवाद साधतील. मंत्री, आमदारांना उपस्थित राहण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. ५ डिसेंबरला महायुती सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत हजेरी लावली होती. त्यानंतर ते आता बुधवारी दुसऱ्यांदा मुंबईत येत आहेत.
मुंबईच्या नौदल गोदीत त्यांच्या हस्ते सकाळी १०.३० च्या सुमारास आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी व आयएनएस वाघशीर या तीन युद्धनौकांचे राष्ट्रर्पण होईल. त्यानंतर नौदल गोदीमध्येच महायुतीचे मंत्री व आमदारांना ते मार्गदर्शन करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आदी उपस्थित असतील. यावेळी सर्वांसाठी खास जेवणाचाही बेत आखला गेला आहे. मंत्री व आमदारांना पंतप्रधान मोदी काय कानमंत्र देतात याबाबत उत्सुकता आहे. दुपारी ३.३० च्या सुमारास पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटनही होणार आहे.
विशेष बसने जावे लागणार, मोबाइल नेता येणार नाही
पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्याशिवाय इतर कोणत्याही वाहनांना नौदल गोदीमध्ये घेऊन जाण्यास परवानगी नसेल. पंतप्रधानांच्या भेटीमुळे दक्षिण मुंबईत होणारी संभाव्य वाहतूककोंडी लक्षात घेऊन आमदारांनाही त्या परिसरात आपली वाहने घेऊन जाता येणार नाही. त्यामुळे आमदारांना गोदीमध्ये घेऊन जाण्यासाठी विशेष बसची व्यवस्था विधानभवनात करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी हे मंत्री, आमदारांना मार्गदर्शन करतील, त्यावेळी व भोजनाच्या वेळी देखील मोबाइल सोबत ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. गेटवर मोबाइल जमा करण्याची व्यवस्था असेल.