Join us
Daily Top 2Weekly Top 5

"पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' मिळाल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार, पण..." - रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 22:38 IST

मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या ८० व्या पुण्यतिथी निमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात पंतप्रधानांना सन्मानित करण्यात आलं.

“माझी थोरली बहीण असलेल्या लतादीदीच्ंया नावे दिला जाणारा पहिला पुरस्कार मला देण्यात आला हे मी माझे सौभाग्य मानतो. संपूर्ण देशाच्या असलेल्या दीदींचा हा पुरस्कार सर्व देशवासियांना समर्पित करतो,” असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या ८० व्या पुण्यतिथी निमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात पंतप्रधानांना सन्मानित करण्यात आलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या.

“पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन! शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि देशात प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असलेले एकमेव नेते शरद पवार यांच्याशीही गानसम्राज्ञी लतादीदी यांचे तेवढेच जिव्हाळ्याचे संबंध होते,” असं रोहित पवार म्हणाले.काय म्हणाले मोदी?यावेळी बोलताना सुरुवातीला मोदींनी पं. हृदयनाथ मंगेशकर यांची प्रकृती लवकरात लवकर ठीक होवो अशी इच्छा व्यक्त केली. “स्व. संगीतकार सुधीर फडके यांनी मंगेशकर कुटुंबियांशी माझी पहिली ओळख करून दिली. त्यानंतर आमचे ऋणानुबंध इतके दृढ झाले की, लतादीदींशी माझे बंधुत्वचे नाते जोडले गेले. आज त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळत असल्याचा आनंद असला तरी पुढच्या रक्षाबंधन दिवशी राखी बांधण्यासाठी दीदी नसतील याचे दु:ख आहे. मी पुरस्कार स्वीकारत नाही, पण हा पुरस्कार माझ्या थोरल्या बहिणीच्या नावे असल्याने नाकारू शकलो नाही. दीदी सर्वांच्या होत्या तसाच हा पुरस्कारही सर्वांचा आहे. दीदींच्या ८० वर्षांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासातील त्यांची गाणी ग्रामोफोनच्या जमान्यापासून आजच्या अँपच्या काळापर्यंत सर्वांना आनंददायी अनुभव देत आहेत,” असे मोदी म्हणाले.

यासोबतच गायक राहुल देशपांडे यांना भारतीय संगीत सेवेकरता मा. दीनानाथ पुरस्कार, आशा पारेख यांना चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवेकरता मा. दीनानाथ विशेष पुरस्कार, जॅकी श्रॉफ यांना चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवेकरता मा. दीनानाथ विशेष पुरस्कार, मुंबईच्या डबेवाल्यांच्या नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टला समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवेकरता (उल्हास मुके) मा. दीनानाथ आनंदमयी पुरस्कार आणि 'संज्या छाया' या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार (दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी) यांना प्रदान करण्यात आले.

टॅग्स :नरेंद्र मोदीरोहित पवारलता मंगेशकर