Join us

सूर ‘मिशन मुंबई’चा...; पंतप्रधानांच्या उपस्थितीत फुंकले BMC निवडणुकांचे रणशिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 06:28 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुंदवली मेट्रो रेल्वे स्थानकावर मेट्रो रेल्वे मार्गिका २ अ आणि ७ चे लोकार्पण

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मुंबई महापालिकेच्या विकासकामांच्या लोकार्पणातून गुरुवारी भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीने ‘मिशन मुंबई’चे रणशिंग फुंकले. मुंबई महापालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी दादरपासून ते वांद्र्यापर्यंत ठिकठिकाणी झळकलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भलेमोठे कटआऊट्स आणि झेंड्यांच्या माध्यमातून  महापालिका निवडणुकांच्या जय्यत तयारीची झलक मुंबईकरांना पाहायला मिळाली. 

विकासकामांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान मोदी यांच्या वांद्रे येथील बीकेसी मैदानावरील जाहीर सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली. मुंबई आणि मुंबईकर डोळ्यांसमोर ठेवूनच सभास्थळी ठिकठिकाणी मुंबई मेट्रो, मलनिस्सारण प्रकल्प, रस्त्यांचे विकास प्रकल्प तसेच विविध विकासकामांचे पोस्टर्स यांनी मुंबईकरांना शाश्वत विकासाची ग्वाही देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मोबाइलमध्ये काय?... बीकेसीतील सभेवेळी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परस्परांच्या शेजारी बसले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा मोबाइल पंतप्रधानांना दाखवला. त्यानंतर त्यांच्यात हास्यविनोद झाला.

‘स्वनिधी से समृद्धी’ने फेरीवाले खूश

सभेमध्ये फेरीवालेही मोठ्या संख्येने होते. ‘स्वनिधी से समृद्धी’ या योजनेची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी करताच अवघ्या १५ मिनिटांत या फेरीवाल्यांचे मोबाइल खणखणले. या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीचे १०  हजार ते १५ हजारांचे कर्ज मिळाल्याचा मेसेज आल्याचे पाहून या फेरीवाल्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

बाउन्सरना पोलिसांनी परत पाठवले

  • मुंबई महानगरपालिकेने बाउन्सरना पाचारण केले होते. मात्र बहुतांश बाउन्सर काळ्या पोशाखात होते, तर काहींनी निळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता.
  • पंतप्रधानांची सभा असल्याने काळ्या रंगाचा पोशाख परिधान केलेल्या बाउन्सरना सभास्थळी प्रवेश देण्यास पोलिसांनी नकार दिला. 
  • निळ्या रंगाचा पोशाख परिधान केलेलेच बाउन्सर थांबू शकतील, असे उपस्थित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे काळ्या रंगाचा पोशाख परिधान केलेले बाउन्सर माघारी परतले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुंदवली मेट्रो रेल्वे स्थानकावर मेट्रो रेल्वे मार्गिका २ अ आणि ७ चे लोकार्पण करण्यात आले. सुमारे १२,६०० कोटी रुपये खर्च करून ही मेट्रो उभारण्यात आली आहे. दहिसर पूर्व आणि डीएन नगर यांना जोडणारी मेट्रो मार्गिका २ अ ही सुमारे १८.६ किमी लांबीची आहे. तर अंधेरी पूर्व - दहिसर पूर्व यांना जोडणारी मेट्रो मार्गिका ७ सुमारे १६.५ किमी लांबीची आहे. २१०५ मध्ये या मार्गिकांची पायाभरणी देखील नरेंद्र मोदी यांनी केली होती.

विशेष बाबी-

  • वांद्रे-कुर्ला संकुलातील कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. सभेमुळे या खासगी कार्यालयांना दुपारी १२ नंतर सुट्टी देण्यात आली. 
  • कार्यक्रमात ‘धर्मवीर’ चित्रपटातील गीतांचे सादरीकरण करण्यात आले.
  • ‘भेटला विठ्ठल’ या गीताच्या सादरीकरणातून स्वर्गीय आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील गुरु-शिष्याचे नाते तसेच दिघे-शिंदे यांच्यातील नातेही अधोरेखित करण्याचा प्रयत्न निवेदिकेने केला.
  • छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने वांद्रे-कुर्ला संकुल दणाणून गेले. सोबतच वीरश्री संचारेल अशा गीतांनी येथील वातावरण मराठमोळे कसे राहील, याची विशेष काळजीही घेण्यात 
  • आली होती.
  • गायक अवधूत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकर यांच्या बहारदार गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. ‘जय जय महाराष्ट्र’चा जागर करताना मुंबईकरांचे आवडते दैवत असलेल्या गणरायाचे गीतही या कार्यक्रमात सादर झाले.
टॅग्स :नरेंद्र मोदीमुंबईएकनाथ शिंदेमुंबई महापालिका निवडणूक २०२२