परंपरा, नवनिर्मितीचा भारतात संगम : मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 08:59 IST2025-08-13T08:58:37+5:302025-08-13T08:59:50+5:30
१८व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र खगोलभौतिकी ऑलिंपियाडचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे

परंपरा, नवनिर्मितीचा भारतात संगम : मोदी
मुंबई : आकाश मर्यादा नाही, ही फक्त सुरुवात आहे. विज्ञान क्षेत्र अनंत आहे. भारतामध्ये परंपरा आणि नवनिर्मिती, अध्यात्म आणि विज्ञान, उत्सुकता आणि सर्जनशीलता यांचा संगम आहे. आर्यभट्टाच्या शून्याच्या शोधापासून पृथ्वीच्या अक्षाभोवती फिरण्याच्या सिद्धान्तापर्यंतचा वारसा भारताला मिळाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. १८व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र खगोलभौतिकी ऑलिंपियाडचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
बोलत होते. व पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशातून ६४ देशांतील ३०० हून अधिक तरुण प्रतिभावंतांचे स्वागत केले. लडाखमधील ४,५०० मीटर उंचीवरील खगोल वेधशाळा, पुण्यातील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप, चांद्रयान-३चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी लँडिंग आणि आदित्य-एल-वन मोहीम यांचा त्यांनी गौरवाने उल्लेख केला.
भारतामध्ये अटल टिंकरिंग लॅब्समधून एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांना सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथेमेटिक्स या क्षेत्रांतील प्रत्यक्ष प्रयोगांची संधी मिळत आहे. 'वन नेशन वन सबस्क्रिप्शन' योजनेंतर्गत मोफत आंतरराष्ट्रीय जर्नल्सची उपलब्धता, महिला सहभागातील आघाडी आणि संशोधनातील गुंतवणूक यांचा त्यांनी ऊहापोह केला. अवकाश विज्ञानाचा उपयोग हवामान अंदाज, नैसर्गिक आपत्तीबाबत भाकीत, जंगलातील आगींचे निरीक्षण, हिमनद्या वितळणे आणि दुर्गम भागातील संप्रेषण सुधारण्यासाठी व्हावा. उच्च ध्येय ठेवा, मोठी स्वप्ने पाहा आणि प्रयत्नरत राहा, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय सूद, आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेचे माजी उपाध्यक्ष प्रा. अजित केंभावी, आदी मान्यवर उपस्थित होते.
हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे ऑलिंपियाड
भारत आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या शक्तीवर विश्वास ठेवतो आणि या ऑलिंपियाडमध्ये त्याच भावनेचे प्रतिबिंब दिसते, असे पंतप्रधानांनी सांगितले. या वर्षीचे हे ऑलिंपियाड आतापर्यंतचे सर्वांत मोठे असल्याचे त्यांनी नमूद केले. या आयोजनासाठी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र व टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या योगदानाबद्दल त्यांनी आभार मानले.
अशा होणार स्पर्धा
मुंबईतील जिओ वर्ल्ड कॉन्व्हेंशन सेंटर बॉलरूम येथे २१ ऑगस्टपर्यंत खगोल ऑलिंपियाड होत आहे; तर पुढील १० दिवस चालणाऱ्या या स्पर्धा पवईतील वेस्टर्न पवई लेक हॉटेल तसेच नेहरू प्लॅनेटोरिअम, वरळी येथे होणार आहेत.