हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 06:30 IST2025-11-01T06:29:49+5:302025-11-01T06:30:49+5:30
एफआयआरमध्ये रोहितकडून गोळीबाराचा उल्लेख नाही

हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
मुंबई: पवई ओलीस नाट्य घडविण्यासाठी रोहित आर्याने चित्रपट लेखक, दिग्दर्शक यांची गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून निवड करत हा सुनियोजित कट आखल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. शूटिंगच्या नावाखाली २६ ऑक्टोबरपासून त्याने त्याची रंगीत तालीम सुरू केली होती. पोलिसांच्या एंट्रीनंतर रोहितने त्यांच्या दिशेने बंदूक रोखताच त्याच्यावर गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, एफआयआरमध्ये रोहितने कुठेही गोळीबार केल्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
आर्याने रोहन आहेरची भेट घेत ऑडिशनबाबत सांगितले. त्याला त्याच्यावर प्रशिक्षित शूटिंगसाठी तयार करण्याची जबाबदारी होती. पोलिसांनी सांगितले की, आर्याने वेबसिरीजसाठी लहान मुलांचे ऑडिशन, अभिनय प्रशिक्षण आणि मालिकेच्या चित्रणामध्ये 'ओलीस नाट्य' हा प्रारंभिक प्रसंग दाखवण्याचा तर्क सांगत विश्वासात घेतले. वेबसिरीजची सुरुवात ओलीस नाट्याच्या प्रसंगाने होईल. त्याचे शूटिंग होईल, असे पालक आणि मुलांना सांगितले. त्यामुळे प्रत्यक्ष ओलीस नाट्य सुरू झाले तेव्हा रंगीत तालीम सुरू असल्याचे प्रत्येकाला वाटले. त्याने काही मुलांचे हात बांधले, तोंडाला पट्टी बांधली. बंदूक रोखली.
ऑडिशन निव्वळ आभास असून, नेमक्या कटाबद्दल गुरुवारी दुपारी दीडपर्यंत स्टुडिओमध्ये हजर एकाही व्यक्तीला पुसटशी कल्पना नव्हती.
तपास गुन्हे शाखेकडे वर्ग
याप्रकरणी पवई पोलिसांनी एन्काउंटर करणारे अमोल वाघमारे यांच्या तक्रारीवरून आर्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आर्याने स्टुडिओच्या प्रत्येक मार्गावर मूव्हिंग सीसीटीव्ही तसेच प्रत्येक दरवाजाला मोशन सेन्सर बसवले होते. मुख्य प्रवेशद्वार वेल्डिंग करून बंद केले.
रोहित आर्याच्या छाती आणि पाठीतून गोळी आरपार गेल्याची जखम
रोहित आर्याच्या छाती आणि पाठीतून गोळी आरपार गेली होती. तशी जखम असल्याचे जे. जे. रुग्णालयात झालेल्या शवविच्छेदनातून समोर आले आहे. शवविच्छेदन करण्यापूर्वी मृतदेहाचे एक्स-रे काढून घेण्यात आले. या प्रक्रियेचे व्हिडीओद्वारे चित्रीकरण करण्यात आले आहे. रासायनिक परीक्षणासाठी मृतदेहातील व्हिसेरा सांभाळून ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदन करण्यापूर्वी रोहितच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. शवविच्छेदनादरम्यान कुटुंबीयांची उपस्थिती महत्त्वाची असल्याने उशीर झाला होता.