गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 06:36 IST2025-08-16T06:26:51+5:302025-08-16T06:36:36+5:30

पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या मुंबईच्या गणेशोत्सवाचे आधुनिकतेच्या नावाखाली बाजारीकरण

Play Marathi songs during Ganeshotsav Coordination Committee insists | गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका

गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका

मुंबई : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर आपल्या चालण्या बोलण्यात किंवा व्यवहारात तिचा वापर करणे गरजेचे आहे. शिवाय गणेशोत्सवासह नवरात्रौत्सवासारख्या उत्सवांतून मराठीचा जागर होणे अपेक्षित आहे. अशा उत्सवातून मराठीचा जागर व्हावा, यासाठी यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात मराठी गाणीच वाजविण्याची आग्रही भूमिका बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने घेतली आहे.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी 'लोकमत' कार्यालयात येऊन संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी गणेशोत्सवाचा पारंपरिकपणा जपण्याबाबत भूमिका मांडली. गणेशोत्सवाचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या मुंबईच्या गणेशोत्सवाचे आधुनिकतेच्या नावाखाली बाजारीकरण झाले आहे. गणेशोत्सवात डीजेच्या दणदणाटासह बॉलीवूडच्या कर्णकर्कश गाण्यांनी उत्सवाचा पारंपरिकपणा कमी झाला आहे, त्यामुळेच आम्ही मराठी भावगीते, भक्ती गीते यांच्यासाठी आग्रही आहोत, असे समन्वय समितीच्या सदस्यांनी सांगितले.

मंडळांनी आगमन मिरवणुकांपासूनच मराठी गाणी वाजवावी. गणपतीत दहा दिवस मराठीचा जागर करणारे विविध कार्यक्रम घ्यावेत. मराठी भावगीते, भक्तीगीते, सुगम संगीत यांना त्यात प्राधान्य द्यावे. जुन्या जाणत्या मराठी कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे, अशीही भूमिका समितीने मांडली. कोकणात पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो. स्थानिक कला व कलाकारांना त्यात प्राधान्य मिळते. त्याच पद्धतीने मुंबईत पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव करावा. विसर्जन मिरवणुकांतही धिंगाणा घालण्याऐवजी पारंपरिक वाद्यांवर मंडळांनी भर द्यावा. त्यातून मुंबईचा गणेशोत्सव अधिक मराठमोळा होईल, असा आशावाद समितीने व्यक्त केला.

जोपर्यंत मराठी भाषेचा अभिमान बाळगून सर्व दिशांनी तिची अभिवृद्धी करणे आपले कर्तव्य आहे, असे महाराष्ट्रातील लोकांना वाटत नाही, तोपर्यंत मराठी भाषा चांगल्या रीतीने नावारूपास येण्याची आशा करू नका, असे विचार लोकमान्य टिळकांनी मांडले होते. त्यामुळे लोकमान्यांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव साजरा व्हावा. यंदाच्या उत्सवात मंडळांनी उडती गाणी वाजविण्यापेक्षा मराठी गाणी वाजवावी ही समन्वय समितीची भूमिका आहे अॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती.
 

Web Title: Play Marathi songs during Ganeshotsav Coordination Committee insists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.