दांडिया, गरबा मनापासून खेळा, पण हृदयाला जपा; दुर्लक्ष करणे धोक्याचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:53 IST2025-09-28T13:53:15+5:302025-09-28T13:53:37+5:30
वैज्ञकीय तज्ज्ञांचा माेलाचा सल्ला; तरुण-तरुणी अचानक बेशुद्ध पडण्याच्या घटनांमध्ये सतत वाढ

दांडिया, गरबा मनापासून खेळा, पण हृदयाला जपा; दुर्लक्ष करणे धोक्याचे
मुंबई: नवरात्रोत्सवात गरबा, दांडियामध्ये तरुण मोठ्या संख्येने सहभागी होतात. गेल्या काही वर्षांत गरबा, दांडिया खेळताना तरुण-तरुणी अचानक बेशुद्ध पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काहींना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊ शकतो. त्यामुळे गरबा मनापासून खेळा, पण हृदयाला जपा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
रक्तदाब व हृदयविकाराशी संबंधित त्रास आहे, त्यांनी गरबा खेळताना विशेष काळजी घ्यावी. ‘गरबा किंवा दांडिया हा उच्च तीव्रतेचा ॲरोबिक व्यायाम आहे. ज्यामध्ये व्यक्तीला सातत्याने हालचाल करावी लागते. नाचत राहिल्यास हृदयाला आवश्यक ऑक्सिजन आणि पोषक घटकांची गरज असते, ज्याची पूर्तता करताना हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढतो, अशी माहिती डॉ. शीतल कर्णिक यांनी दिली.
असा होतो शरीरावर परिणाम
सामान्यत: प्रत्येक व्यक्तीला विशेषत: बैठ्या जीवनशैलीची सवल झाली आहे. अशा व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा तीव्र व्यायाम किंवा नृत्य करण्यापूर्वी समान्य इको आणि स्ट्रेस टेस्ट करण्याची शिफारस केली जाते.
गरबा किंवा दांडियासारखे खेळ खेळताना प्रचंड धावपळ होते आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. हृदयाची गती अनियंत्रित होते आणि अचानक हृदय बंद पडू शकते.
वेळीच शरीराची मर्यादा ओळखा
गरबा खेळताना दम लागत असेल, चक्कर येत असेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. शरीराची क्षमता लक्षात घ्या. थकवा जाणवल्यास ताबडतोब विश्रांती घ्या. योग्य काळजी घेतली तर नवरात्रोत्सवाचा आनंद सुरक्षितपणे आणि निरोगीपणे घेता येतो.
काय काळजी घ्याल?
मादक पदार्थांचे सेवन करू नका : जर तुम्ही गरजा किंवा दांडिया खेळायला जात असाल तर मादक पदार्थांचे सेवन करू नका, दारू, सिगारेट अशा मादक पदार्थांचे सेवन केल्यामुळे तुमच्या हृदयावर ताण पडतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे मादक पदार्थांचे सेवन करू नका.
व्यायाम करा : आपल्या शरीरासाठी नियमित व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. व्यायाम केल्यामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते. तसेच शारीरिक तंदुरुस्तीदेखील महत्त्वाची आहे. हृदयविकाराच्या झटक्यापासून स्वत:चे संरक्षण करायचे असल्यास नियमित व्यायाम करा.
व्यायाम करा : आपल्या शरीरासाठी नियमित व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. व्यायाम केल्यामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते. तसेच शारीरिक तंदुरुस्तीदेखील महत्त्वाची आहे. हृदयविकाराच्या झटक्यापासून स्वत:चे संरक्षण करायचे असल्यास नियमित व्यायाम करा.