‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 06:02 IST2025-09-27T06:01:14+5:302025-09-27T06:02:02+5:30
सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्पासाठी २४५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. अमरावती, बल्लारशाह ट्रेन दादरपर्यंत

‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
मुंबई - मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा १८ नंबरचा प्लॅटफॉर्म पायाभूत कामे आणि सुरक्षा बॅरिकेड्स उभारण्याच्या कामासाठी १ ऑक्टोबरपासून सुमारे ३ महिने बंद राहणार आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरून सुटणाऱ्या अमरावती-सीएसएमटी आणि बल्लारशाह-सीएसएमटी या दोन्ही एक्स्प्रेस गाड्या दादरपर्यंत चालवण्यात येणार आहे.
सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्पासाठी २४५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. रेल्वे भूमी विकास प्राधिकरण (आरएलडीए) मार्फत करण्यात येत आहेत. सीएसएमटीच्या सर्व प्लॅटफॉर्मवर विस्तारित डेक उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी टप्प्याटप्प्याने सर्व प्लॅटफॉर्मवर पायलिंगचे काम केले जात आहे. यासाठी हा प्लॅटफॉर्म बंद करण्यात येत आहे. सध्या सीएसएमटी येथे प्लॅटफॉर्म ११ ते १८ वर सुमारे २० ते २२ एक्स्प्रेस दररोज धावतात. या ट्रेन पकडण्यासाठी सुमारे १ लाख प्रवासी रोज प्लॅटफॉर्म १८ वरून इतर प्लॅटफॉर्मवर पोहोचतात. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म तीन महिने बंद राहिला तर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
प्लॅटफॉर्म १२ आणि १३ खुला होणार
रेल्वेने गेल्यावर्षी प्लॅटफॉर्म १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले. त्यामुळे ते बंद करण्यात आले होते. परिणामी या ठिकाणावरून सुटणाऱ्या एक्सप्रेस दादरसह इतर ठिकाणांवरून सोडण्यात येत होत्या. नॉन-इंटरलॉकिंगची कामे मार्च महिन्यात पूर्ण झाली असून, रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा प्रमाणपत्रदेखील रेल्वेला मिळाले आहे. परंतु, रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाची काही कामे बाकी असल्याने तो फलाट सध्या प्रवासी वापरासाठी खुला करण्यात आलेला नाही.
नव्या डेकवर काय असणार?
नव्याने बांधण्यात येणाऱ्या डेकमध्ये तिकीट काउंटर, प्रतीक्षा क्षेत्रे, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि वरच्या मजल्यावर खरेदी आणि मनोरंजन केंद्र अशा सुविधा असतील.