Mahaparinirvan Din 2025: महापरिनिर्वाण दिनासाठी दादर स्टेशनवर नियोजन, ४०० पोलिस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची फौज तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 11:46 IST2025-12-03T11:44:26+5:302025-12-03T11:46:09+5:30
Mahaparinirvan Din 2025 News: कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे ४०० लोहमार्ग पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Mahaparinirvan Din 2025: महापरिनिर्वाण दिनासाठी दादर स्टेशनवर नियोजन, ४०० पोलिस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची फौज तैनात
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार, ५ डिसेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी रात्री १२ या कालावधीत दादर रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना मर्यादित प्रवेश देण्यात येतील.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे ४०० लोहमार्ग पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे दादर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले.
फलाटावर प्रवेश करण्यासाठी असे असेल नियोजन
मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकातील पूर्व-पश्चिम जोडणारा मोठा ब्रिज व फलाट क्र. १२ वरील सर्व प्रवेशद्वार शहर हद्दीतून रेल्वे स्थानकात येण्यासाठी बंद राहील. एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी पूल खुला राहील.
पूर्व-पश्चिम शहर हद्दीतून येणाऱ्या अनुयायी व दैनंदिन रेल्वे प्रवाशांसाठी दादर रेल्वे स्थानकांवरील फलाटावर येण्याकरिता खुला राहील.

दादर पश्चिम रेल्वे स्थानक फलाट क्र. १ वरील स्कायवॉक ब्रिजलगतचे गेट क्र.१, ६ व ७ वगळता सर्व प्रवेशद्वार हे रेल्वे प्रवासी व अनुयायांना शहर हद्दीतून फलाटावर येण्यास बंद राहतील.
दादर पश्चिम रेल्वेस्थानक फलाट क्र. १ वरील लंगडा/आंधळा पादचारी पूल शहर हद्दीतून येणाऱ्या रेल्वे प्रवासी व अनुयायांना पश्चिमेकडून पूर्वकडे जाण्यास बंद राहील.