'बेस्ट' तिकिटात ५०% सवलत, ५ लाख बिनव्याजी कर्ज; ४८ लाख महिलांसाठी योजनांचा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 06:35 IST2026-01-12T06:33:51+5:302026-01-12T06:35:03+5:30
भाजप-शिंदेसेना-रिपाइं (आ) महायुतीचा वचननामा जारी

'बेस्ट' तिकिटात ५०% सवलत, ५ लाख बिनव्याजी कर्ज; ४८ लाख महिलांसाठी योजनांचा पाऊस
मुंबई : गेल्या विधानसभेत निवडणुकीत 'लाडक्या बहिणीं'नी महायुतीला भरघोस मतदान केल्याने महायुती पुन्हा सत्तेत आल्याचे म्हटले जाते. आता हाच फॉर्म्युला महायुतीने मुंबई महापालिकेतही राबविण्याचा निर्णय ५० घेतला आहे. बेस्ट बस प्रवासात महिलांना टक्के सवलत आणि स्वयंरोजगारांसाठी 9 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, सुरक्षेसाठी रात्रीचे गस्त पथक, महिला बचत गटांसाठी ३० हजार रुपयांचे अनुदान देण्याचे आश्वासन भाजप महायुतीने वचननाम्यात दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी 'मुंबईसाठीचा आपला वचननामा' प्रसिद्ध केला. सुमारे २.६५ लाख सूचना मुंबईकरांनी पाठविल्या होत्या. या सूचनांच्या आधारे महायुतीचा वचननामा, मुंबईकरांचा वचननामा तयार केल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले. मुंबईतील मराठी माणसाच्या घराचा प्रश्न, २४ तास पाणीपुरवठा आणि नोकरदारांसाठी प्रवासाच्या सेवा-सुविधांचे जाळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यावर वचननाम्यात भर देण्यात आला आहे. मुंबईत ४८.२६ लाख महिला मतदार असल्याने महायुतीच्या घोषणा महिलांना कितपत आकर्षित करू शकतील, हे निकालातूनच दिसून येईल.
५ वर्षांनंतर 'अॅक्शन टेकन रिपोर्ट'
इतरांचा वचननामा आणि आमचा वचननामा यात अंतर आहे. आमचा वचननामा आम्ही पूर्ण करू. इतकेच नाही, तर पाच वर्षानंतर जनतेच्या समोर जाताना 'अॅक्शन टेकन रीपोर्ट' देऊ. वचननाम्यात दिलेली कोणती, किती आश्वासने पूर्ण करू शकलो, याचा आढावा देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
बांगलादेशी, रोहिंगेमुक्त मुंबई
गेल्या वर्षभरात सर्वाधिक बांगलादेशी, रोहिंगे शोधून त्यांना परत पाठविले आहे. आयआयटीच्या मदतीने एक टूल तयार करण्यात येत आहे, ज्यामुळे बांगलादेशी शोधणे सोपे होईल. पुढील ५-६ महिन्यांत टूल तयार झाल्यानंतर १०० टक्के बांगलादेशी, रोहिंगे शोधून काढून त्यांना परत पाठविण्यात येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
'गारगाई' साठी मिळाल्या परवानग्या
गारगाई प्रकल्पाबाबत वन आणि पर्यावरण खात्याच्या सर्व परवानग्या मिळाल्या. यामुळे पहिल्या टप्प्यात ५०० दशलक्ष लिटर पाणी मुंबईला मिळणार आहे. तसेच दमनगंगा-पिंजाळ आणि अन्य प्रकल्पांना चालना दिली असून, २०६० मधील अपेक्षित लोकसंख्येला पुरेल इतके पाणी देण्याचे नियोजन केले आहे.
वचननाम्यात काय?
बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम, खड्डेमुक्त रस्त्यांकडे वाटचाल पावसात मुंबई थांबणार नाही, यासाठी १७,००० कोटींचा प्रकल्प १७,००० कोटींची पर्यावरण संवर्धन योजना, बेस्ट बसचा ताफा १० हजारांपर्यंत वाढवणार प्रत्येक प्रभागात अग्निरक्षक, कोळीवाड्यांमध्ये होम-स्टे, खाद्य पर्यटन वर्सोवा-विरार-ठाणे कोस्टल रोड जोडून 'एमएमआर'साठी आऊटर रिंग रोड करणार मुंबईला 'फिनटेक सिटी' बनविणार, प्रत्येक चौकात हवा प्रदूषण पातळी दाखविणारे बोर्ड पालिकेच्या सर्व शाळांमध्ये एआय लॅब तयार करणार, नाईट पेट्रोलिंग पथके