भाविकांच्या गर्दीत साध्या वेशातील पोलिसांचा वॉच, सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे नजर, २० हजार पोलिसांचा फौजफाटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 11:47 IST2025-08-26T11:39:24+5:302025-08-26T11:47:56+5:30
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत २० हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज झाला आहे. गणेशोत्सव काळात संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे पोलिसांचा वॉच असणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी भाविकांच्या गर्दीत साध्या गणवेशातील पोलिस लक्ष ठेवून असणार आहेत.

भाविकांच्या गर्दीत साध्या वेशातील पोलिसांचा वॉच, सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे नजर, २० हजार पोलिसांचा फौजफाटा
मुंबई - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत २० हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज झाला आहे. गणेशोत्सव काळात संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे पोलिसांचा वॉच असणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी भाविकांच्या गर्दीत साध्या गणवेशातील पोलिस लक्ष ठेवून असणार आहेत.
मुंबईत लालबाग, परळ, गिरगाव, खेतवाडी, अंधेरी, चिंचपोकळी, विलेपार्ले, डोंगरी, उमरखाडीसह विविध ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. यासाठी पोलिसांकडून गणेशोत्सव मंडळासोबत बैठका घेत मार्गदर्शन करण्यात आले आहे. संवेदनशील ठिकाणी मिरवणूकदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी साध्या गणवेशातील पोलिसांचा वॉच असणार आहे. गोवंडी, देवनार, मालाड, मालवणी, उमरखाडी, नागपाडा, मदनपुरा, भेंडी बाजार, वांद्रे परिसरात पोलिसांचे विशेष बंदोबस्त तैनात आहे. तसेच सायबर पोलिस सर्व सोशल मीडियावरही लक्ष ठेवून आहे.
गणेशोत्सव काळातील गर्दीची संधी साधून दहशतवादी कृती, घातपात घडू नये या उद्देशाने पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. त्यात सागरी हद्दीसह मोक्याच्या ठिकाणी सुरक्षा, गस्त वाढविणे, परदेशी नागरिकांसह गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांची धरपकड करण्यात आली आहे. तसेच राज्य राखीव पोलिस बल, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक तैनात असणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
डीजे वाजवला तर...
पोलिस आयुक्तालयाने जारी केलेल्या डीजे, ड्रोन बंदीच्या आदेशांसह वाहतुकीबाबतच्या नियोजनाचे काटेकोर पालन करणे, मंडपाभोवती सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे, स्वयंसेवक नेमून गर्दीचे नियोजन करण्याबाबत सूचना गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना दिल्या आहेत.
असा आहे बंदोबस्त
एकूण फौज २० हजार
पोलिस उपआयुक्त ३६
सहायक आयुक्त ५१
अधिकारी २६३७
अंमलदार १४४३०
सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त तैनात आहे. भाविकांनीही नियमांचे पालन करावे. शांततामय वातावरणात गणेशोत्सव साजरा करा. अफवांवर विश्वास
ठेवू नका. तसेच, कुठलीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधा.
- सत्यनारायण चौधरी,
सह पोलिस आयुक्त, (कायदा व सुव्यवस्था) मुंबई पोलिस