बोरीवलीमध्ये पीयूष गोयल यांचा सत्कार; यूके बाजारातील निर्यात संधींवर चर्चासत्राचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 20:47 IST2025-07-27T20:44:21+5:302025-07-27T20:47:05+5:30

भारतीय उद्योजक आणि निर्यातदारांसाठी नव्या करारामुळे उपलब्ध झालेल्या संधींबाबत देण्यात आली माहिती

Piyush Goyal felicitated in Borivali Seminar organized on export opportunities in UK market | बोरीवलीमध्ये पीयूष गोयल यांचा सत्कार; यूके बाजारातील निर्यात संधींवर चर्चासत्राचे आयोजन

बोरीवलीमध्ये पीयूष गोयल यांचा सत्कार; यूके बाजारातील निर्यात संधींवर चर्चासत्राचे आयोजन

मुंबई: भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या प्रवासात एक ऐतिहासिक क्षण ठरलेला, भारत–यूके मुक्त व्यापार करार झाल्यानंतर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचा आज दुपारी बोरीवलीत सत्कार करण्यात आला. बोरीवली पश्चिम येथील पॅराडाईज हॉलमध्ये झालेल्या या सत्कार समारंभात, 'यूके बाजारातील निर्यात संधी' या विषयावर एक विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी भारतीय उद्योजक आणि निर्यातदारांसाठी या करारामुळे उपलब्ध झालेल्या नव्या संधींबाबत माहिती देण्यात आली.

हा कार्यक्रम दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. यामध्ये निर्यातदार, एमएसएमई प्रतिनिधी, व्यापारी, स्टार्टअप्स आणि औद्योगिक संघटनांचे सदस्य असे विविध उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स, मत्स्य व्यवसाय संघटना, तारापूर औद्योगिक उत्पादक संघटना, लघु उद्योग भारती आणि डाय मेकर्स असोसिएशन आणि अन्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

या संवादात्मक सत्रात यूकेच्या व्यापार धोरणांवर, कर लाभांवर, सुलभ निर्यात प्रक्रियांवर, गुणवत्ता मानकांवर आणि लॉजिस्टिक उपायांवर सखोल चर्चा झाली. तज्ञांनी मार्गदर्शन करताना सांगितले की भारतीय उद्योगपती यूके बाजारपेठेचा प्रभावी वापर कसा करू शकतात, विशेषतः लघु व मध्यम उद्योगांसाठी  ही संधी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

यावेळी पीयूष गोयल म्हणाले की, भारत–यूके मुक्त व्यापार करार हा केवळ व्यापार करार नाही; तो विकसित भारताच्या दिशेने एक धाडसी आणि परिवर्तनशील पाऊल आहे. मत्स्य व्यवसाय, वस्त्र, रत्न व दागिने, आयटी, सेवा क्षेत्र आणि एमएसएमई यांसारख्या क्षेत्रांना या करारामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात नव्या स्पर्धात्मक संधी उपलब्ध होतील. सरकार भारतीय उत्पादकांना जागतिक पातळीवर सुलभ, मुक्त आणि न्याय्य बाजार उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे.

"ही ऐतिहासिक घडामोड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे शक्य झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारत अशा धोरणात्मक आर्थिक भागीदारी निर्माण करत असून ज्यामुळे आपले उद्योग सक्षम बनवतात. यूकेमध्ये भारतीय वस्तूंवर शून्य किंवा अत्यल्प कर लागू होईल, यामुळे निर्यात क्षमता वाढेल, रोजगार निर्मिती होईल आणि आर्थिक प्रगतीला गती मिळेल," असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.

व्यापक आर्थिक परिणामांवर बोलताना मंत्री गोयल म्हणाले की, “कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड अ‍ॅग्रीमेंट (सीईटीए) भारताच्या जागतिक अर्थव्यवस्थेतील स्थानाला अधिक बळकट करेल. अनेक देश भारतासोबत औद्योगिक भागीदारीसाठी उत्सुक आहेत आणि आपण २०३० चा स्पष्ट दृष्टीकोन ठेवून काम करत आहे. मागील सरकारांनी घेतलेल्या चुकीच्या व्यापार निर्णयांमुळे देशाला आर्थिक फटका बसला, पण आजचं नेतृत्व प्रत्येक करार भारताच्या आर्थिक सार्वभौमत्वाला बळकटी देईल."

दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी यांनी आपल्या भाषणात या कराराचा स्थानिक पातळीवरील परिणाम अधोरेखित करणारा आहे.भारत–यूके व्यापार करारामुळे आमच्या स्थानिक समाजात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. मच्छीमार आणि निर्यातदार या करारामुळे खूप आनंदी आहे. कारण आता त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात अधिक चांगल्या अटींवर प्रवेश मिळू शकतो.त्यांनी या दूरदृष्टीपूर्ण व्यापार चौकटीसाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले, जे लघुउद्योगांपासून मोठ्या उद्योगांपर्यंत सर्वांनाच लाभदायक ठरत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी निर्यातदारांसाठी प्रश्नोत्तर आणि सहाय्य सत्र घेण्यात आले, ज्यामध्ये यूके बाजारात प्रवेश करण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रिया, कागदपत्रे आणि शासकीय मदतीबाबत माहिती देण्यात आली. सहभागी उद्योजकांनी सरकारच्या सक्रिय व्यापार धोरणाचे आणि वाणिज्य मंत्रालयाने मांडलेल्या पारदर्शक रोडमॅपचे विशेष कौतुक केले. अखेरीस  पीयूष गोयल यांचे भारताच्या आर्थिक परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी आभार मानले.

Web Title: Piyush Goyal felicitated in Borivali Seminar organized on export opportunities in UK market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.