Pinki Mali Death: एअर होस्टेस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आकाशाला गवसणी घालणारी वरळीची लेक, पिंकी माळी (२९) हिचा अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मुलीच्या विरहाने तिच्या आईची प्रकृती खालावली आहे. "जी गेली ती परत येणार नाही, पण जी सोबत आहे तिला तरी वाचवा," असं म्हणत पिंकी माळीच्या वडिलांनी सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे.
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निवडले क्षेत्र
पिंकी माळी या मूळच्या उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या असल्या, तरी त्यांचे कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून मुंबईतील वरळी सेंचुरी मिल परिसरात वास्तव्यास आहे. पिंकीचे वडील शिवकुमार माळी हे पूर्वी दिल्ली एअरपोर्टवर कार्यरत होते, मात्र काही कारणास्तव त्यांची नोकरी सुटली. आपल्या मुलीने या क्षेत्रात नाव कमवावे, अशी त्यांची इच्छा होती. वडिलांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी पिंकीने एअरलाईन्स क्षेत्र निवडले. गेल्या सहा वर्षांपासून त्या या क्षेत्रात होत्या. सांताक्रुझ इंटरनॅशनल एअरपोर्टवर अनुभव घेतल्यावर त्या व्हीएसआर कंपनीत रुजू झाल्या होत्या.
"अजित पवारांच्या फ्लाईटमध्ये जात आहे..." ते शेवटचे शब्द
अपघाताच्या दिवसाची आठवण सांगताना वडील शिवकुमार माळी यांना गहिवरून आले. ते म्हणाले, "जाताना पिंकी म्हणाली होती की, मी अजित पवार यांच्या फ्लाईटमध्ये जात आहे आणि तिथून नांदेडला जाणार आहे. सकाळी बातम्या लावल्या आणि अपघाताची बातमी पाहिली. सुरुवातीला हाता-पायाला मुंग्या आल्या आणि जेव्हा पिंकीच्या निधनाचे वृत्त समजले, तेव्हा आमच्या पायाखालची जमीनच सरकली.
आईची मृत्यूशी झुंज
पिंकीच्या निधनाचा धक्का तिच्या आईला सहन झाला नाही. "मुलीच्या जाण्याने तिची आई सतत रडत होती, तिने अन्नपाणी सोडले होते. त्यामुळे तिला संसर्ग झाला आणि ती अजूनही रुग्णालयातच आहे. जी मुलगी गेली ती तर परत येणार नाही, पण जी सोबत आहे तिला तरी वाचवले पाहिजे, असं पिंकीचे वडील म्हणाले.
राजकीय नेत्यांबाबत व्यक्त केली खंत
या कठीण काळात स्थानिक नेत्यांनी पाठ फिरवल्याची खंतही माळी यांनी व्यक्त केली. "अमोल मिटकरींचे मोठेपण आहे की त्यांनी वरळीचा हा मुद्दा लावून धरला. खरं तर, वरळी मतदारसंघाच्या नेत्यांनी हा प्रश्न सभागृहात मांडायला हवा होता, पण त्यांनी तसे केले नाही. मिटकरी स्वतः हॉस्पिटलमध्ये आले, त्यांनी माझ्या पत्नीची विचारपूस केली आणि आम्हाला धीर दिला. दुसरीकडे, रोहित पवार आपल्या काकांसाठी दारोदार फिरत आहेत, त्यांच्यासाठी लढत आहेत," असेही पिंकीचे वडील म्हणाले.
"आम्ही फक्त आमच्या मुलीला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहोत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली तरच तिला खरा न्याय मिळेल. उद्या सरकारने गुन्हेगाराला शोधले तरी त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळेलच, पण माझी मुलगी गमावल्याचे दुःख कसे भरून येणार? सरकारने ठरवले तर आमच्या मुलाला सरकारी नोकरी देऊन आमच्या जखमांवर फुंकर घालता येईल," अशी भावना पिंकींच्या वडिलांनी व्यक्त केली.
Web Summary : After Pinki Mali's tragic death in an aircraft accident, her family faced neglect from local leaders. Amol Mitkari stepped forward, offering support. The grieving father seeks justice, a fair investigation, and government assistance for his surviving family, especially his ailing wife.
Web Summary : विमान दुर्घटना में पिंकी माली की दुखद मृत्यु के बाद, उनके परिवार को स्थानीय नेताओं से उपेक्षा का सामना करना पड़ा। अमोल मिटकरी ने आगे बढ़कर सहायता प्रदान की। शोकाकुल पिता न्याय, निष्पक्ष जांच और अपने जीवित परिवार, विशेषकर अपनी बीमार पत्नी के लिए सरकारी सहायता चाहते हैं।