राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; वकिलाने केली गुन्हा दाखल करण्याची मागणी, कार्यकर्त्यांचाही उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 13:48 IST2025-07-19T13:39:44+5:302025-07-19T13:48:56+5:30
भाषिक द्वेष पसरवल्याचा आरोप करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे

राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; वकिलाने केली गुन्हा दाखल करण्याची मागणी, कार्यकर्त्यांचाही उल्लेख
Raj Thackeray: मराठीच्या मुद्द्यावरुन मनसैनिकांनी मिरारोड येथे एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर देशभरातली हिंदी भाषिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात रोष व्यक्त केला. शुक्रवारी मिरा भायंदर इथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी इतर भाषिकांना मराठी शिका आणि महाराष्ट्रात शांतपणे राहा असा इशारा दिला. त्यानंतर आता थेट सर्वोच्च न्यायालयात राज ठाकरेंविरोधात भाषिक द्वेष पसरवल्याचा आरोप करत याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे.
हिंदी भाषिक लोकांविरुद्ध हिंसाचार भडकवल्याचा आणि भाषिक द्वेष पसरवल्याचा आरोप करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. वकील घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
Maharashtra: A PIL against MNS chief Raj Thackeray filed before Supreme Court for allegedly inciting violence against Hindi-speaking people and language-based hatred. The plea seeks an FIR against Thackeray and his party workers. The plea has been filed by a lawyer, Advocate…
— ANI (@ANI) July 19, 2025
यापूर्वीही राज ठाकरे यांच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. वरळीतल्या विजयी जल्लोष मेळाव्यात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप करत अॅड. नित्यानंद शर्मा, अॅड.पंकज कुमार मिश्रा आणि अॅड. आशिष राय यांनी ही तक्रार केली. महाराष्ट्रत परप्रांतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचा दावा करत मुख्य सूत्रधार आणि दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम एनएसए अंतर्गत कारवाई करण्याची मागणी वकिलांनी केली होती.
अमराठी मतदारसंघ बनवून भूभाग गुजरातला देण्याचा डाव : राज ठाकरे
नगरसेवक, आमदार, खासदार निवडून आणायचे, अमराठी मतदारसंघ बनवून हा भूभाग गुजरातला मिळवायचा हा यांचा डाव आहे. हिंदुत्वाच्या बुरख्याआडून मराठी संपवण्याचे राजकारण सुरू आहे. तुम्ही प्रत्येकाशी मराठीतच बोला, असं आव्हान राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदर येथील सभेत केलं. हिंदी सक्तीचा प्रयत्न तर करून बघा, दुकानेच नाही. शाळाही बंद करु असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.