कबुतरखाना वाद: मानवी आरोग्यावर कबुतरांचा परिणाम तपासण्यासाठी तज्ज्ञ समिती गठित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 11:02 IST2025-08-23T11:02:10+5:302025-08-23T11:02:53+5:30

३० दिवसांच्या आत शासनाला आपला अहवाल सादर करणे अपेक्षित

Pigeon loft controversy: Expert committee formed to examine the impact of pigeons on human health | कबुतरखाना वाद: मानवी आरोग्यावर कबुतरांचा परिणाम तपासण्यासाठी तज्ज्ञ समिती गठित

कबुतरखाना वाद: मानवी आरोग्यावर कबुतरांचा परिणाम तपासण्यासाठी तज्ज्ञ समिती गठित

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मानवी आरोग्यावर कबुतरांचा होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी राज्य शासनाने शुक्रवारी तज्ज्ञ समिती गठित केली. मुंबई उच्च न्यायालयाने १३ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने पहिल्या बैठकीपासून ३० दिवसांच्या आत शासनाला आपला अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.

समितीमध्ये सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण, पशुवैद्यकीय विज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, फुप्फुसतज्ज्ञांचा समावेश आहे. समितीचे अध्यक्ष म्हणून विजय कांबळे–संचालक, सार्वजनिक आरोग्य सेवा, पुणे यांची नियुक्ती केली आहे. सदस्य सचिव म्हणून जितेंद्र भोपळे–संचालक, नगर रचना विभाग, सदस्य म्हणून किशोर रिठे-संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, डॉ. प्रदीप देशमुख–प्राध्यापक व विभागप्रमुख, कम्युनिटी मेडिसीन, एम्स नागपूर, डॉ. शिवाजी पवार–उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, डॉ. एस. के. दत्ता–सचिव, प्राणी कल्याण मंडळ, डॉ. सुजित रंजन– फुप्फुसतज्ज्ञ, डॉ. अमिता आठवले– फुप्फुसतज्ज्ञ, मुंबई महापालिका, डॉ. मनीषा मडकईकर–संचालक, आयसीएमआर, रोगप्रतिकारशक्तीतज्ज्ञ, डॉ. आर. जे. झेंडे–प्राध्यापक, पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्यशास्त्र विभाग, डॉ. शिल्पा पाटील-सहयोगी प्राध्यापक, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, ग्रँट मेडिकल कॉलेज व जेजे हॉस्पिटल, दक्षा शाह–कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका यांचा समावेश आहे.

समितीच्या कार्यकक्षा

  • सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे
  • कबुतरांच्या विष्ठेचा आरोग्यावर होणारा परिणाम तपासणे
  • कबुतरांना नियंत्रित पद्धतीने अन्न देण्याची शक्यता व त्याचे परिणाम अभ्यासणे
  • संबंधित नियमावली तयार करणे
  • याचिकाकर्त्यांकडून प्राप्त निवेदनांचा अभ्यास करणे

Web Title: Pigeon loft controversy: Expert committee formed to examine the impact of pigeons on human health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.