कोरोनामुक्तीसाठी फिलिपिन्स राबविणार ‘धारावी पॅटर्न’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 04:51 IST2020-08-19T04:50:37+5:302020-08-19T04:51:03+5:30
संस्थात्मक विलगीकरण, जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी, तत्काळ निदान, योग्य उपचार आणि लवकर डिस्चार्ज यामुळे धारावीतील कोरोनाचा प्रसार रोखण्यात प्रशासनाला यश आले.

कोरोनामुक्तीसाठी फिलिपिन्स राबविणार ‘धारावी पॅटर्न’
मुंबई : कोरोनामुक्तीच्या धारावी पॅटर्नचे कौतुक संपूर्ण जगात होत आहे. जागतिक आरोग्य संघटना, वॉशिंग्टन पोस्ट यांनी धारावीप्रमाणे कोरोनाविरुद्ध लढा देण्याचा सल्ला अन्य देशांना दिला होता. त्यानुसार, आता आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत यशस्वी ठरलेली ‘चेस द व्हायरस’ मोहीम फिलिपिन्स सरकार तेथील झोपडपट्ट्यांमध्ये राबविणार आहे.
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे आहे. मात्र दाटीवाटीने वसलेल्या धारावी झोपडपट्टीत हे शक्य नसल्याने प्रसार रोखणे आव्हानात्मक ठरत होते. त्यात अडीच चौरस किलोमीटर परिसरात वसलेल्या धारावीत साडेआठ लाख लोकवस्ती आहे. दहा बाय दहाच्या खोल्यांमध्ये राहणारे आठ ते दहा लोक आणि सार्वजनिक शौचालयांचा वापर, यामुळे येथे कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत होता. परंतु, संस्थात्मक विलगीकरण, जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी, तत्काळ निदान, योग्य उपचार आणि लवकर डिस्चार्ज यामुळे धारावीतील कोरोनाचा प्रसार रोखण्यात प्रशासनाला यश आले.
धारावीमधील लढ्याने दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या अन्य शहरांसाठी आदर्श निर्माण केला आहे, असे कौतुक अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टमध्ये करण्यात आले होते. धारावीमध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर गेल्या दीड महिन्यात रुग्णांची संख्या दिवसाला चार ते पाच एवढीच आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही नियंत्रणात आहे. फिलिपिन्समध्ये अशीच दाट झोपडपट्टी असल्याने तेथे धारावी मॉडेल अमलात आणण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.
>मंगळवारी आढळले केवळ चार रुग्ण
धारावीत मंगळवारी केवळ चार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत येथे २,६७६ लोकांना कोरोना झाला असून २,३३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
>...अन् धारावी जिंकली
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीत कोरोनाचा शिरकाव झाला आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. आता संसर्ग संपूर्ण मुंबईत झपाट्याने पसरणार, अशी भीती वाटत असतानाच पालिका प्रशासनासह डॉक्टर्स, नर्स, आरोग्यसेविका, सफाई कर्मचारी, पोलीस या सर्वांनीच दिवसरात्र एक करून, तहान-भूक विसरून सेवा दिली. प्रत्येक टप्प्यात त्यांनी कोरोना येथून कसा हद्दपार होईल यासाठी झपाटल्याप्रमाणे काम केले. त्यांच्या जोडीलाच छायाचित्रकारांनीही संसर्गाची पर्वा न करता या लढ्यातील प्रत्येक क्षण टिपला. त्यामुळेच धारावी जिंकली, जगासाठी आदर्श ठरली. हे यश आहे ते याच कोरोना योद्ध्यांचे. त्यांना
‘लोकमत’चा सलाम!