फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 06:24 IST2025-11-01T06:24:46+5:302025-11-01T06:24:59+5:30
महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक स्थापन करा

फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
मुंबई : फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले आहेत. याप्रकरणात विविध आरोप-प्रत्यारोप होत असताना याचा तपास एसआयटीकडे देण्याची मागणी होत होती. त्या अनुषंगाने निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एसआयटी स्थापन करण्याबाबतचा अधिकृत आदेश शनिवारी निघण्याची शक्यता असून या एसआयटीत कोणते अधिकारी असणार याबाबत उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने हातावर सुसाइड नोट लिहित आत्महत्या केली होती. या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे दोन पीए, तसेच पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. एका रुग्णाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी आपल्यावर दबाव आल्याची तक्रारही तिने केली होती.
सातारा पोलिसांनी याची चौकशी केली तर त्यांच्यावर दबाव राहू शकतो, त्यामुळे एसआयटी चौकशी करावी अशी मागणी विरोधक सातत्याने करत होते. महिला डॉक्टरची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा दावाही विरोधकांनी केला आहे.
फलटणमध्ये आज कँडल मार्च
पीडित डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीड बंदनंतर आता फलटणमध्येही कँडल मार्च आयोजित केला आहे. हा कँडल मार्च १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता गजानन चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून निघणार आहे.
मयत डॉक्टर तरुणी आणि २ आरोपींच्या मोबाइलमध्ये प्रकरणाचे 'रहस्य' कैद
पंढरपूर : डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणाचे वास्तव मांडण्याची पोलिसांना परवानगी दिली तर जे समोर येईल ते सर्वांना स्वीकारावे लागेल. या संपूर्ण प्रकरणाचे रहस्य मयत तरुणी आणि दोन आरोपींसह इतर काही मोबाइलमध्ये कैद असल्याचा मोठा दावा ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केला. मात्र, आपल्या संस्कृतीमध्ये जीवित किंवा मयत भगिनीबद्दल अनादर करण्याची पद्धत नाही, असे विधान गोरे यांनी केले आहे.
नाईक-निंबाळकर बँडला धक्का : रामराजे
फलटणमधील या घटनेमुळे नाईक-निंबाळकर ब्रँडला धक्का बसला आहे. प्रशासनाकडे आम्ही पीडित महिला डॉक्टरचा पुतळा उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभारण्याची मागणी करणार आहोत. ती मागणी मान्य न झाल्यास पुतळा स्वखर्चातून उभारू; मग कोण आडवे येते ते पाहू, असे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी म्हटले आहे.
चाकणकर यांच्या विरोधात उद्धवसेनेचे पुण्यात आंदोलन
रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. त्यामुळे त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करत उद्धवसेना महिला आघाडीने आंदोलन केले. चाकणकर यांच्या गारमाळ (धायरी) येथे संपर्क कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.