Join us  

इंधन दरवाढीचा भडका ! पेट्रोल 28 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 7:20 AM

Fuel Hike : इंधन दरवाढ आणि महागाईच्या विघ्नात दिवसेंदिवस वाढ होत जात आहे. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.

मुंबई - इंधन दरवाढ आणि महागाईचे विघ्न दिवसेंदिवस वाढत जात आहे. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात 28 पैशांनी वाढ झाल्यानं पेट्रोलचा दर प्रति लिटर 89.29 रुपये एवढा झाला आहे तर डिझेल 19 पैशांनी महागल्यानं एक लिटर डिझेलमागे 78.26 रुपये मोजावे लागणार आहेत. 

दररोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे.  देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चालले असून, या दरवाढीचा सर्वाधिक फटका येथील वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इतर वस्तूंचेही भाव वाढत आहेत. 

(कॉर्पोरेट पे करम, पब्लिक पे सितम!)

दिल्लीतही पेट्रोलचे दर 28 आणि डिझेलचे दर 18 पैशांनी वधारले आहेत. इंधनाचे दर वाढल्यानं माल वाहतूक महागली आहे. त्यामुळे सर्व वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. महागाईचा जबरदस्त फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.  इंधनाच्या दरांमध्ये कपात करण्यात यावी. याबाबत सरकार काय करत आहे?, कुठे आहेत अच्छे दिन?, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. (सर्वात कमी दरात पेट्रोल विक्री करणारे गोवा राज्य देशात दुसरे)

दरम्यान,  केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडून देशात पाच इथेनॉल निर्मितीचे कारखाने उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे डिझेल 50 आणि पेट्रोल 55 रुपये प्रति लिटर दरानं उपलब्ध होईल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलमुळे इंधनाचे दर कमी होण्यास मदत होईल, असंदेखील गडकरी म्हणाले होते. पण हे सर्व काही प्रत्यक्षात कधी होणार, असा प्रश्न जनता उपस्थित करत आहे. 

टॅग्स :इंधन दरवाढपेट्रोलडिझेल