Join us

"पेट्रोल ४० ने वाढवले अन् २ रुपयांनी कमी केले"; जयंत पाटलांनी मोदींकडे मागितली गॅरंटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 14:29 IST

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनीही पेट्रोल दरकपातीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

मुंबई - लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मोदी सरकारने देशातील सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी कपात करण्यात आली असून, नवीन किंमती आज रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाल्या आहेत. त्यावरुन, सत्ताधारी पक्षाचे नेते, हा सर्वसामान्यांना दिलासा असल्याचे सांगत आहेत. २ रुपये दरकपात ही दिलासाच असल्याचं भाजपा नेते म्हणत आहेत, दुसरीकडे विरोधकांनी हा निर्णय निवडणुकांच्या तोंडावर घेतल्याची टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनीही पेट्रोल दरकपातीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट करुन पेट्रोल-डिझेलच्या दरकपातीबाबत माहिती दिली होती 'पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत २ रुपयांनी कपात करुन देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, कोट्यवधी कुटुंबाचे कल्याण हे त्यांचे ध्येय आहे. जग कठीण काळातून जात असताना विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पेट्रोलचे दर ५० ते ७२ टक्क्यांनी वाढले होते. आपल्या शेजारील अनेक देशांमध्ये तर पेट्रोल उपलब्ध नव्हते. १९७३ नंतर पहिल्यांदाच इंधनाचे सर्वात मोठे संकट असूनही पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे देशावर त्याचा परिणाम झाला नाही. भारतातील पेट्रोलचे दर वाढण्याऐवजी गेल्या अडीच वर्षांत ४.६५ टक्क्यांनी कमी झाले.', असे हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे. मात्र, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकारने हा निर्णय घेतला असून २ रुपये ही मोठी दरकपात नसल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. तर, ४० रुपयांनी पेट्रोलचे दर वाढवले आणि २ रुपयांनी कमी केले, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

''निवडणुका आल्या की पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करायचे आणि निवडणुका संपल्या की पुन्हा दर वाढवायचे. हे आता नित्याचेच झाले आहे. वाढलेले ४० रुपये व कमी केलेले २ रुपये महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला स्पष्टच दिसते. कमी झालेले २ रु. पुन्हा वाढणार नाहीत याची गॅरंटी काय?, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे. 

३९ देशांकडून कच्च्या तेलाची खरेदी 

पुरी यांनी पुढे लिहिले की, 'भारतात इंधनाचा पुरवठा स्थिर राहिला, स्वस्त दरात राहिला आणि सरकारची पावलेही हरित ऊर्जेकडे जात राहिली. याचा अर्थ भारताने उर्जेची उपलब्धता, शाश्वतता राखली. भारत हा एकमेव देश होता, जिथे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या नाहीत. पीएम मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी २७ देशांकडून कच्चे तेल खरेदी करायचो, परंतु मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या देशवासीयांना स्वस्त पेट्रोल, डिझेल आणि गॅस देण्यासाठी ही व्याप्ती वाढवली आणि आता गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही २९ देशांकडून खरेदी करत आहोत.'  

टॅग्स :पेट्रोलजयंत पाटीलनरेंद्र मोदी