एसआरएची १०७ प्रकल्पांच्या मान्सूनपूर्व कामासाठी परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 18:30 IST2020-05-26T18:29:40+5:302020-05-26T18:30:20+5:30
झोपडपट्टी सुधार मंडळाने (एसआरए) १०७ प्रकल्पांच्या मान्सूनपूर्व कामासाठी परवानगी दिली आहे.

एसआरएची १०७ प्रकल्पांच्या मान्सूनपूर्व कामासाठी परवानगी
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळाने (एसआरए) १०७ प्रकल्पांच्या मान्सूनपूर्व कामासाठी परवानगी दिली आहे. अवघ्या दोन आठवड्यांमध्येच या कामाची मंजुरी अतिशय जलदगतीने देण्यात आली आहे. पावसाळ्यात झोपडपट्टीतील रहिवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठीच एसआरएमार्फत ही विक्रमी वेळेत परवानगी देण्यात आली आहे.
१०७ प्रकल्पांच्या मान्सूनपूर्व कामांना मंजुरी दिल्याबाबत एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपुर यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे. अतिशय सावधानतापूर्वक आणि सर्व सुरक्षितता बाळगत ही कामे सुरू असल्याचे त्यांनी नमुद केले आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एसआरएने एक परिपत्रक जारी करत मान्सूनपूर्व कामांसाठी योग्य खबरदारी घेत कामे करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामध्ये कोविड- १९ च्या अनुषंगाने खबरदारी घेत ही कामे करायची आहेत असे परिपत्रकात नमुद करण्यात आले होते.
झोपड्यांच्या जागेवर इमारती बांधण्यासाठी एसआरए अंतर्गत विकासकांना परवानगी देण्यात येते. झोपडीवासीयांना चांगल्या राहणीमानाची सुविधा देण्यासाठी अशा प्रकल्पांसाठी पुढाकार घेण्यात येत आहे. मान्सूनच्या कालावधीत कोणत्याही अप्रिय घटनेला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणूनच एसआरएमार्फत या परवानग्या देण्यात आल्या आहेत.