Peace at Shivaji Park, Shiv Sena's Dussehra rally online for the first time in history | शिवाजी पार्कवर शांतता, इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचा 'दसरा मेळावा ऑनलाईन'

शिवाजी पार्कवर शांतता, इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचा 'दसरा मेळावा ऑनलाईन'

ठळक मुद्देकोरोनामुळे यंदाच्या वर्षी गुढीपाढवा, गणेशोत्सव, रमजानसारख्या सणावर परिणाम झाला असून अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले. गुढीपाढव्याला निघणारी शोभायात्राही रद्द झाली. येत्या २५ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. यावर्षीचा दसरा मेळावा शिवसैनिकांसाठी विशेष असणार आहे.

मुंबई  – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या दसरा मेळाव्यावर यंदा कोरोनाचं संकट आहे. शिवाजी पार्क येथे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा मेळावा होतो. मात्र, मुंबईत वाढत चाललेली कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता यंदाचा दसरा मेळावा रद्द होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यास सरकारकडून बंदी आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या निकटवर्तीय सुत्रांनी दिली. त्यामुळे, यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला शांतता दिसणार आहे.

कोरोनामुळे यंदाच्या वर्षी गुढीपाढवा, गणेशोत्सव, रमजानसारख्या सणावर परिणाम झाला असून अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले. गुढीपाढव्याला निघणारी शोभायात्राही रद्द झाली. येत्या २५ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. यावर्षीचा दसरा मेळावा शिवसैनिकांसाठी विशेष असणार आहे. शिवसेनेची सत्ता, त्यात ठाकरे कुटुंबातील व्यक्ती - तीही खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याला वेगळंच महत्त्व आहे. पण, अद्याप पक्षामध्ये दसरा मेळाव्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, कोरोनाची परिस्थिती पाहता शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा होणार नाही. मात्र, ऑनलाईन पद्धतीने यंदाचा दसरा मेळावा घेण्यात येईल. दरम्यान, यंदा 19 जून रोजी शिवसेनेचा स्थापना दिवसही ऑनलाईन पद्धतीनेच साजरा करण्यात आला होता. यावेळी, मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला होता.

यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करु शकतात असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘लोकमत ऑनलाइन’शी बोलताना सांगितले होते. तर, यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार असल्याचे शिवसेनेतील काही उच्चपदस्थांनी सांगितले आहे. त्यासाठी शिवसेनेच्या डिजिटल टीमकडून कार्यक्रमाची आखणी करण्यात येत आहे. राज्यातील, देशातील, जगभरातील शिवसैनिकांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन संवाद साधणार आहेत.  

शिवसेना-शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा यांचे वर्षानुवर्ष समीकरण बनलं आहे. दसऱ्याच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवाजी पार्कवर गर्दी जमत असे. शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्क येथे झाला होता. शिवाजी पार्क म्हणजे शिवसेनेसाठी शिवतीर्थ.. याठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणानं आणि शिवसैनिकांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दसऱ्याच्या दिवशी दणाणून जायचा. शिवसेनेचा दसरा मेळाव्यातून बाळासाहेबांच्या भाषणातून लाखो शिवसैनिक विचारांचे सोने लुटत. या मेळाव्यातून बाळासाहेब राज्य तसेच देशाच्या राजकारणावर आसूड ओढत असे. प्रथा आणि परंपरेनुसार दसरा मेळाव्यात पहिल्यांदा शस्त्रपूजा केली जाते, त्यानंतर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची भाषण होत असे आणि सर्वात शेवटी पक्षाचे प्रमुख शिवसैनिकांना मार्गदर्शन करतात.

शिवसेनेच्या इतिहासात आतापर्यंत दोन वेळा दसरा मेळावा रद्द झाला होता. २००६ मध्ये प्रचंड पाऊस आल्यामुळे मेळावा रद्द करण्याची वेळ आली होती तर २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत मेळावा पुढे ढकलला होता. यंदा देशभरात तसेच राज्यात कोरोनाचं संकट आहे. अनेक सण-उत्सव कोरोनामुळे रद्द करावे लागले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी जमू नये यासाठी शासनाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा गर्दी टाळण्यासाठी खुल्या मैदानात होणार नाही. तसेच, कोरोनाचं संकट असल्याने मोठ्या हॉलमध्येही कार्यकर्त्यांना बोलावण्यात येणार नाही. गर्दी टाळून ऑनलाईन पद्धतीने यंदाचा दसरा मेळावा होणार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Peace at Shivaji Park, Shiv Sena's Dussehra rally online for the first time in history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.