ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 15:22 IST2023-12-09T15:21:36+5:302023-12-09T15:22:05+5:30
मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १० हजार ५१९ वाहन चालकांना जिल्हा विधि सेवा प्राधिकरणामार्फत प्रलंबित दंडाची रक्कम भरण्यासाठी नोटीस पाठवल्या आहेत.

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस
मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १० हजार ५१९ वाहन चालकांना जिल्हा विधि सेवा प्राधिकरणामार्फत प्रलंबित दंडाची रक्कम भरण्यासाठी नोटीस पाठवल्या आहेत. ज्या वाहन चालकांनी ऑनलाइन दंड भरलेला नाही त्यांनी शनिवार डिसेंबर रोजी लोकअदालतमध्ये हजर व्हावे, असे फर्मान वाहतूक पोलिसांनी काढले आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर वन स्टेट वन ई-चालानद्वारे कारवाई करण्यात येते तसेच अपराधाची व तडजोडपात्र दंडाची रक्कम भरणा करण्याचे संदेश भ्रमणध्वनीवर पाठविण्यात येतात. तरीदेखील अनेक वाहन चालक, मालक दंडाची रक्कम भरीत नाहीत. अशा प्रकारे मोटार वाहन अधिनियमांचे अपराध करणारे एकूण १७ लाख १० हजार ५१९ वाहनचालकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबईमार्फत प्रलंबित दंडाची रक्कम भरणा करण्याबाबत नोटीस पाठविण्यात आहेत. तरी संबंधित वाहनमालक व चालकांनी शक्य तितक्या लवकर ऑनलाइन पोर्टल, Mumtrafficapp मोबाइल अॅप, नेट बँकिंग अथवा जवळच्या वाहतूक पोलीस विभागात जाऊन दंडाची रक्कम भरावी असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
माझ्या वाहनावर दंड आहे का?
अनेक चालकांना आपल्या वाहनावर काही दंड आहे का असा प्रश्न सतावतो. मात्र आपण घरबसल्या याची माहिती मिळवू शकता. महाट्रॅफिक अॅप डाऊनलोड करुन माय व्हेइकलमध्ये जाऊन तेथे आपल्या वाहनाचे रजिस्ट्रेशन करायचे. तेथे असलेल्या माय-इ चलान येथे आपण आपल्या वाहनावरील दंड बघू शकतो. पे ई-चलानमधून थकीत पेमेंट भरता येते, शंका असेल तर तेथे असलेल्या गिव्ह रिजनमध्ये तक्रार नोंदवू शकता.
१ वाहन चालकाला दुसऱ्यांदा पकडल्याशिवाय तो दंड भरत नाही. त्यामुळे दंडाची रक्कम वाढत जाते.
२. आता वाहतूक पोलिसांकडून दंड न भरणाऱ्या वाहन चालकांवर न्यायालयात खटले दाखल करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.