६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 06:27 IST2025-10-10T06:27:00+5:302025-10-10T06:27:09+5:30
ई-बस सेवेत पास प्रणाली सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. विशेषतः नोकरी किंवा व्यवसायानिमित्त रोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ होणार आहे.

६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) राज्यातील ई-बस प्रवाशांसाठी मासिक आणि त्रैमासिक पास सवलत योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना ६० दिवसांचे भाडे भरून ९० दिवस प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
ई-बस सेवेत पास प्रणाली सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. विशेषतः नोकरी किंवा व्यवसायानिमित्त रोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ होणार आहे. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील ४४८ बसेस आणि शिवाई प्रकल्पातील ५० ई-बसेस कार्यरत आहेत. या बसेसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा मानस असल्याचे सरनाईक म्हणाले.
महामंडळाच्या या निर्णयामुळे दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, पर्यावरणपूरक व आरामदायी प्रवासासाठी ई-बसचा वापर वाढण्यास मदत होईल.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
मुंबईपासून जवळ असलेल्या ठाणे - अलिबागसारख्या मार्गावर मोठ्या संख्येने दैनंदिन प्रवासी तसेच ई-बसेस सेवा आहेत. योजनेमुळे प्रवाशांचा फायदा होईल.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, एसटी कर्मचारी काँग्रेस
जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे...
पास उपलब्ध बसेस : ९ मीटर ई-बस, १२ मीटर ई-बस आणि ई-शिवाई सेवा (ई-शिवनेरीवगळून).
मासिक पास (३० दिवस) : २० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून ३० दिवस वैध.
त्रैमासिक पास (९० दिवस) : ६० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून ९० दिवस वैध.
लवचिकता : उच्च सेवा वर्गाचा (ई-बस) पास असलेले प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमधून प्रवास करू शकतील.
फरक नियम : निमआराम किंवा साध्या बसचा पासधारक ई-बसने प्रवास करत असल्यास, दोन्ही सेवांतील भाड्याचा फरक १०० टक्के दराने भरावा लागेल.