मुंबई : बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील निकाल पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे. मुंबईतील विशेष सीबीआयन्यायालयाने गुरुवारी निकाल जाहीर न करता तो आता १६ जूनपर्यंत तहकूब केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री असल्याने हे प्रकरण अधिक संवेदनशील आहे.
धाराशिवचे खा. ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची ३ जून २००६ रोजी कळंबोली येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
तपास यंत्रणांच्या आरोपानुसार, पवनराजे यांचा वाढता राजकीय प्रभाव लक्षात घेऊन त्यांची हत्या करण्याचा कट पद्मसिंह पाटील यांनी रचला होता. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह नऊजणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
अंतिम सुनावणीदरम्यान पाटील यांच्यासह सात आरोपी न्यायालयात उपस्थित होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व विशेष सीबीआय न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे.
दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता या प्रकरणाचा निकाल जूनमध्ये जाहीर होणार आहे. आरोपी पद्मसिंह पाटील यांच्या वतीने सुमारे १,२५० पानांचे लेखी निवेदन न्यायालयात सादर करण्यात आले आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
२५ लाखांची सुपारी
आरोपपत्रानुसार, पवनराजे यांच्या हत्येसाठी तब्बल २५ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडे होता. त्यानंतर तो गुन्हे अन्वेषण विभागाकडे व पुढे सीबीआयकडे वर्ग करण्यात आला.
Web Summary : The verdict in the Pawanraje Nimbalkar murder case has been postponed. The CBI court will now deliver its verdict on June 16. Padma Singh Patil is the main accused.
Web Summary : पवनराजे निंबालकर हत्याकांड में फैसला टल गया है। सीबीआई अदालत अब 16 जून को अपना फैसला सुनाएगी। पद्मसिंह पाटिल मुख्य आरोपी हैं।