मोटरसायकल घेऊन पठ्ठ्या सी लिंकवर शिरला, पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 12:44 IST2023-04-28T12:43:55+5:302023-04-28T12:44:36+5:30
गुजरातच्या तरुणाला अटक

मोटरसायकल घेऊन पठ्ठ्या सी लिंकवर शिरला, पोलिसांनी केली अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वांद्रे वरळी सी-लिंकवर एक पठ्ठ्या थेट मोटरसायकल घेऊन शिरला. हा प्रकार बुधवारी घडल्यानंतर याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी किरण सुनील भाई पटेल (२४) या तरुणाला अटक केली आहे. जो मूळचा गुजरातचा राहणारा आहे.
पटेल कांदिवलीत राहणाऱ्या त्याच्या १७ वर्षांच्या मित्रासोबत दुचाकी चालवत होता. त्यानुसार त्याची दुचाकीही जप्त केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास वांद्रे- वरळी सी लिंक येथे घडली. आरोपी पटेल हा वरळीच्या बाजूने सी लिंकवरून दाखल झाला होता. ही बाब लक्षात आल्यावर सी लिंकच्या दुसऱ्या लेनवर त्याला पोलिस नाईक मंगेश रणदिवे यांनी अडविले. नाईक यांनी पटेलला सी लिंकवर दुचाकी चालविण्यास परवानगी नसल्याचे सांगितले, त्यावेळी त्याने आपले वाहन न थांबवून चुकीच्या बाजूने यू-टर्न घेतला आणि सी लिंक पुलाच्या चुकीच्या बाजूने पळून जाण्याचा प्रयत्न केला. सी लिंकच्या प्रवेशावर बॅरिकेड्स होते त्यामुळे तिथून पळून जाण्यापूर्वी पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला पकडले.