वर्षाच्या पहिल्याच रविवारी रेल्वे प्रवाशांचे मेगाहाल; स्थानकांवर खोळंबा झाल्याने नाराजीचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 06:04 IST2025-01-06T06:03:23+5:302025-01-06T06:04:01+5:30
पश्चिम रेल्वेने केली प्रवाशांची गैरसोय

वर्षाच्या पहिल्याच रविवारी रेल्वे प्रवाशांचे मेगाहाल; स्थानकांवर खोळंबा झाल्याने नाराजीचा सूर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर देखभाल- दुरुस्तीच्या कामांसाठी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मेगाब्लॉकमुळे अनेक नियमित फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. परिणामी, सर्व उपनगरी सेवा किमान १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर सुमारे ५ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. ब्लॉककाळात डाउन मार्गावरील वाहतूक माटुंगा आणि मुलुंड या स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात आली होती. या लोकल विद्या विहार, कांजूरमार्ग आणि नाहूरस्थानकात थांबल्या नाहीत. त्यामुळे तेथील प्रवाशांचा खोळंबा झाला. हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान ब्लॉक घेण्यात आला होता. पनवेल ते वाशी वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्याचा परिणाम सीएसएमटी- पनवेल आणि ठाणे- पनवेल वाहतुकीवर झाला.
परेने केली गैरसोय
चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. ब्लॉक कालावधीत अप आणि डाउन धीम्या मार्गावरील उपनगरीय सेवा जलद मार्गावरून वळविण्यात आल्या होत्या. ब्लॉक काळात चर्च गेटपर्यंत येणाऱ्या काही फेऱ्या वांद्रे किंवा दादर येथे खंडित करण्यात आल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. नवीन वर्षाची सुरुवातच ब्लॉकने झाल्यामुळे प्रवाशांनी रेल्वेच्या नावाने बोटे मोडली.