काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 05:35 IST2025-08-20T05:34:51+5:302025-08-20T05:35:18+5:30

अग्निशमन दलाने काच तोडून हवेचा मार्ग केला मोकळा, गाडी ओढून वडाळा स्थानकात प्रवाशांना उतरविले

Passengers of Mono bus were thrown out by breaking the glass! 'That was all that was left to happen', angry reaction of passengers | काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया

काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुसळधार पावसामुळे लोकल सेवा बंद पडली. मोनोने प्रवास करणारे प्रवासी सायंकाळी आशेने घराकडे निघाले पण वाटेतच मोनो कलंडली व बंद पडली. दोन तास घुसमटणाऱ्या प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी मोनोची काच फोडून बाहेर येण्याचा मार्ग निवडला. तेव्हा तेथे आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शिड्या लावून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. मैसूर कॉलनी स्थानकाजवळ ही घटना घडली.

गाडीतील विद्युत प्रवाह ही बंद झाल्याने १६ प्रवासी आतच गुदमरले. तीन प्रवाशांना रुग्णालयात दाखल करावे लागले. अग्निशमन दलाने काचा फोडून हवेचा मार्ग मोकळा केला. मध्य व हार्बर सेवा बंद पडल्याने प्रवाशांनी घरी जाण्यासाठी मोनोचा पर्याय निवडला. अन्य दिवशी रिकाम्या धावणाऱ्या मोनोमध्ये मंगळवारी उभे राहण्यासाठीही जागा नव्हती. वडाळ्याकडून चेंबूरच्या दिशेने निघलेली मोनो ६.१५च्या सुमारास मैसुर कॉलनी स्थानकाजवळ बंद पडली. प्रवाशांनी पालिकेच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधला. मात्र तासभर तेथे कोणीही पोहोचले नाही.

घटनेची चौकशी होणार : मुख्यमंत्री

एमएमआरडीए आयुक्त महापालिका आयुक्त, पोलिस आणि सर्वच यंत्रणांशी संपर्कात आहे. तिन्ही यंत्रणांनी मिळून मदत कार्य पूर्ण केले. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन मदतकार्य राबविण्यात आले. हा प्रकार का घडला याचीही चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गाडीची क्षमता ५६२ प्रवाशांची

एमएमआरडीएच्या संकेतस्थळावर मोनोची प्रवासी क्षमता ५६२ दिली आहे. पालिकेने ४४२ हून अधिक प्रवाशांची सुटका केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अधिक प्रवासी कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गाडी का बंद पडली?

मोनोची क्षमता १०४ टनांची आहे. प्रवासी वाढल्याने वजन १०९ टनापर्यंत पोहचले. सुरक्षा रक्षकांनी अडवूनही गाडीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आले. ही गाडी पुढे गेली. या मोनोच्या वायडक्टवरच विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा आहे. गाडीत वजन वाढल्याने पॉवर रेल आणि करंट कलेक्टर यांच्यातील यांत्रिक संपर्क तुटला. त्यातून गाडीचा विद्युत पुरवठा बंद झाला. कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो झाला नाही. तसेच अधिकच्या वजनामुळे गाडी खेचून नेण्यातही अडचणी येत होत्या.
-प्रवक्ता, एमएमआरडीए

Web Title: Passengers of Mono bus were thrown out by breaking the glass! 'That was all that was left to happen', angry reaction of passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.