घाटकोपर-वर्साेवा मेट्रोच्या ई-तिकीट सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 14:39 IST2022-04-25T14:39:11+5:302022-04-25T14:39:29+5:30
दैनंदिन विक्री १० टक्क्यांहून कमी; पेपर तिकिटाकडे कल अधिक

घाटकोपर-वर्साेवा मेट्रोच्या ई-तिकीट सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद
मुंबई : तिकीट काउंटरवर होणारी गर्दी टाळण्यासह पर्यावरण संवर्धनास हातभार लावण्याच्या उद्देशाने गेल्या आठवड्यात घाटकोपर-वर्साेवा मेट्रो १ मार्गावर ई-तिकीट प्रणाली सुरू करण्यात आली. मात्र, आठवडाभरातील दैनंदिन प्रवाशांच्या तुलनेत ई-तिकिटांची विक्री १० टक्क्यांच्या पुढे सरकलेली नाही. याउलट पेपर तिकिटाकडे अधिक कल असल्याचे दिसून येत आहे.
मेट्रो-१ प्रशासनाने ‘पेपर क्यूआर तिकीट’ सेवेचा विस्तार करीत १५ एप्रिलपासून व्हाॅट्सॲपद्वारे‘ई-तिकीट’ काढण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली. त्यामुळे व्हाॅट्सॲपवर ई-तिकीट उपलब्ध करून देणारी मेट्रो-१ ही जगातील पहिली एमआरटीएस (मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम) ठरली. मेट्रोने प्रवास करणारा अधिकांश प्रवासी हा सुशिक्षित नोकरदार असल्याने या प्रणालीला मोठा प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते. मात्र, आठवडाभराच्या कामगिरीवर नजर टाकली असता दैनंदिन ई-तिकीट विक्री १० टक्केही झाली नाही.
१५ ते २१ एप्रिलदरम्यान घाटकोपर ते वर्साेवा मेट्रो मार्गावरून ७ लाख ७६ हजार ९०९ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातील केवळ ३९ हजार ३४ प्रवाशांनी ई-तिकीट खरेदी केले. तर या काळात तब्बल ७ लाख ३७ हजार ८७५ ‘पेपर क्यूआर तिकिटांची विक्री झाली. दरम्यान, ई-तिकिटांची मागणी नैसर्गिकरित्या वाढावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी प्रतिक्रिया मेट्रो १ च्या प्रवक्त्यांनी दिली. सध्या तिकीट काउंटरवर एका मिनिटाला सरासरी ६.५ ‘पेपर क्यूआर तिकीट’ काढली जातात. ई-तिकीटमुळे ही संख्या प्रतिमिनिट १२ तिकिटांवर पोहोचली आहे.
व्हॉट्सॲपवर तिकीट कसे काढाल?
९६७०००८८८९ या व्हाॅट्सॲप क्रमांकावर ‘हाय’ असा संदेश पाठवा किंवा क्यूआर कोड स्कॅन करा
व्हाॅट्सॲपवर आलेला ओटीपी तिकीट काउंटरवर शेअर करा. पैसे भरा आणि गंतव्य स्थान सांगा
त्यानंतर क्षणार्धात व्हाॅट्सॲप क्रमांकावर तिकीट येईल. ते प्रवेशद्वारावर स्कॅन केल्यानंतर फलाटावर प्रवेश मिळेल.