Join us
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना 'बाईक टॅक्सी'ने घेतला बळी! महिला प्रवाशाच्या मृत्यूनंतर उबरसह संचालकावर गुन्हा, बाईकही दुसरी वापरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 16:35 IST

विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी उबरसह संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Bike Taxi: पूर्व द्रुतगती महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात उबर कंपनीच्या माध्यमातून विनापरवाना चालवण्यात येत असलेल्या एका दुचाकी टॅक्सीला भरधाव मिक्सर ट्रकने धडक दिली. या दुर्दैवी घटनेत दुचाकीवरील महिला प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेची गंभीर नोंद घेत परिवहन विभागाने केलेल्या तक्रारीनंतर, नवघर पोलिसांनी बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सी सेवा चालवल्याप्रकरणी थेट उबर कंपनीसह तिच्या संचालकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

भरधाव अपघातात महिला प्रवाशाचा मृत्यू

या अपघात २९ नोव्हेंबर रोजी पूर्व द्रुतगती महामार्गावरील ऐरोली फ्लायओव्हर पुलाखाली झाला. आरोपी जवाहीर बशराज यादव (४०) याने त्याच्या ताब्यातील मिक्सर ट्रक निष्काळजीपणे चालवत बाईक टॅक्सीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचा चालक गणेश विश्राम माधव गंभीर जखमी झाला, तर प्रवासी महिला शुभांगी सुरेंद्र मगरे (४९) यांचा जागीच मृत्यू झाला. नवघर पोलिसांनी निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल मिक्सर ट्रक चालक यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेने बाईक टॅक्सी कंपन्यांच्या नियमांचे उल्लंघन करण्याची गंभीर बाजू उघड केली आहे.

विनापरवाना वाहतूक आणि नियमांचे उल्लंघन

वडाळा येथील मोटार वाहन निरीक्षक रवींद्र गावडे (३२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून उबर कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, नियमांनुसार ॲप-आधारित प्रवासी वाहतुकीसाठी उबरला केवळ तात्पुरती परवानगी देण्यात आली होती, ज्यात फक्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याची अट होती. मात्र, याचे उल्लंघन करून कंपनीच्या माध्यमातून पेट्रोल दुचाकी रस्त्यावर सर्रासपणे धावत होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे, मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ६६ नुसार, खासगी वाहनातून प्रवासी वाहतूक करता येत नाही. असे असूनही, उबर कंपनी या तरतुदींचा भंग करून प्रवाशांच्या जीवांशी खेळत होती, असे तक्रारीत स्पष्ट नमूद केले आहे.

या अपघातात वापरलेली दुचाकी केवळ विनापरवानाच नव्हती, तर त्यात मोठी हेराफेरी करण्यात आल्याचेही उघड झाले आहे. चालक माधव याने त्याच्या मामाच्या (शेखर मनोहर चव्हाण) नावावर असलेली दुचाकी उबरसाठी वापरली. कंपनीकडे नोंदणी केलेली स्कूटर न वापरता माधवने स्वतःच्या नावावर नसलेल्या दुचाकीचा वापर प्रवासासाठी केला. ही प्रवाशांची फसवणूक आणि परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन आहे. कोणतीही अधिकृत परवानगी न घेता प्रवासी वाहतूक सुरू ठेवल्यामुळे कंपनीने विनापरवाना नोंदणी करून फसवणूक केल्याचेही यातून स्पष्ट झाले.

या घटनेमुळे विनापरवाना बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपन्यांच्या मनमानी कारभारावर मोठा प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, या प्रकरणात आता उबरसह त्यांच्या संचालकांवर गुन्हा नोंदवण्यात आल्याने पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Illegal Bike Taxi Death: Uber, Director Booked After Fatal Accident

Web Summary : An Uber bike taxi operating without a permit caused a fatal accident. A woman passenger died after a speeding truck hit the bike taxi. Police booked Uber and its directors for illegal operation and using a different bike than registered, highlighting regulatory violations and passenger safety concerns.
टॅग्स :मुंबईआरटीओ ऑफीसबाईकअपघात