“माझा नातू आजारी आहे, जास्त आरडाओरड करू नका”; राज ठाकरेंची उत्साही मनसैनिकांना तंबी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 13:08 IST2023-06-14T13:07:50+5:302023-06-14T13:08:33+5:30
Raj Thackeray Birthday: रात्री १२ वाजता मनसैनिकांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केक कापला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

“माझा नातू आजारी आहे, जास्त आरडाओरड करू नका”; राज ठाकरेंची उत्साही मनसैनिकांना तंबी!
Raj Thackeray Birthday: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. सकाळपासूनच शिवतीर्थावर कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यभरातून राज ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. तत्पूर्वी, नेहमीप्रमाणे यंदाही रात्री १२ वाजता अनेक मनसैनिक राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर गेले होते. रात्री १२ वाजता राज ठाकरे यांनी केक कापला. यावेळी कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. घोषणाबाजी करण्यात आली. मात्र, यावेळी माझा नातू आजारी आहे, जास्त आरडाओरड करू नका, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
राज ठाकरे यांनी रात्री मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा केला. राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला असंख्य मनसैनिक शिवतीर्थावर आले होते. मनसे सरचिटणीस नयन कदम आणि विभागप्रमुख दिनेश साळवी यांनी रात्री राज ठाकरे यांच्या घरी जाऊन वाढदिवस साजरा केला. राज ठाकरे केक कापण्यासाठी आलेले असताना आणि त्यांनी केक कापल्यानंतर मनसे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संपूर्ण शिवाजी पार्क परिसर दणाणून गेला.
माझा नातू आजारी आहे, जास्त आरडाओरड करू नका
घराबाहेर घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी प्रेमाने फटकारले. आवाज करू नका, जास्ती आरडाओरडा करू नका. माझा नातू आजारी आहे आणि तो झोपला आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी ही माहिती दिल्यानंतर कार्यकर्तेही शांत झाले.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाच्या बाहेरील रस्त्यावर बॅरिकेट लावण्यात आलेत. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दादरच्या सर्व भागांमध्ये कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. “भावी मुख्यमंत्री” असा उल्लेख असलेले बॅनर कार्यकर्त्यांकडून झळकवण्यात आले आहेत.