Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुणरत्न सदावर्ते यांना अंशतः दिलासा; एक तक्रार फेटाळण्याचे हायकोर्टाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 09:38 IST

सदावर्ते यांच्या उपस्थितीशिवाय यादव यांची ही तक्रार फेटाळा, असे आदेश न्यायालयाने काउन्सिलला दिले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात दाखल केलेली एक तक्रार फेटाळण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने महाराष्ट्र ॲण्ड गोवा बार काउन्सिलला गुरुवारी  दिले. सामाजिक कार्यकर्ते नितीन यादव यांच्या तक्रारीची दखल घेतल्याबद्दल काउन्सिलला न्या. गौतम पटेल व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने खडेबोलही सुनावले. 

यादव यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सदावर्ते यांची अल्पवयीन मुलगी परवाना नसतानाही कार चालवत होती आणि सदावर्ते त्याच कारमध्ये होते. काउन्सिलने या आरोपाची दखल घेतल्याने न्यायालयाने संताप व्यक्त केला. सदावर्ते यांच्या उपस्थितीशिवाय यादव यांची ही तक्रार फेटाळा, असे आदेश न्यायालयाने काउन्सिलला दिले. 

‘आरोप गंभीर आहेत, असे काउन्सिलला वाटते; पण आम्हाला वाटत नाही. जर १८ मेपर्यंत हे थांबले नाही, तर आम्ही थांबवू आणि आमच्याकडे बोलण्यासाठी खूप काही असेल. आम्ही त्यांचा अपमान  होऊ देणार नाही. तक्रारदार उपस्थित असले किंवा नसले तरी तुम्ही तक्रार फेटाळाल,” असे न्यायालयाने म्हटले.

मात्र, न्यायालयाने दुसऱ्या तक्रारीबाबत सदावर्ते यांना दिलासा देण्यास नकार दिला. सदावर्ते यांच्याविरोधात दुसरी तक्रार पिंपरी कोर्ट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुशील मंचेकर यांनी केली आहे. सदावर्ते यांनी सार्वजनिक कार्यक्रमात विशेषतः एस.टी. संपाच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात काळा कोट घालून सामील झाल्याचे मंचेकर यांनी तक्रारीत म्हटले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :गुणरत्न सदावर्तेमुंबई हायकोर्ट