Join us  

सर्वोच्च निकालानंतर पार्थ पवारांना अत्यानंद, दोन शब्दांत व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 12:01 PM

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी  पार्थ पवार यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. यावेळी पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या मागणीवर पार्थ पवार यांचे आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आज याप्रकरणी सुनावली केली. त्यानुसार, या घटनेचा तपास सीबीआयने करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनाही न्यायालयानं केल्या. न्यायालयाच्या सर्वोच्च निकालानंतर पार्थ पवार यांनी आनंद व्यक्त करत शेवटी सत्याचाच विजय झाल्याचे म्हटलंय. 

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी  पार्थ पवार यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. यावेळी पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी सीबीआय चौकशीची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही याप्रकरणी मत मांडलं होतं. त्यावेळी, पार्थ यांना इनमॅच्यूअर असल्याचेही त्यांनी म्हटले होते.  

"माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इनमॅच्युअर (अपरिपक्व) आहेत. सीबीआयबाबत जे बोलले आहेत तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही", असे शरद पवार यांनी सांगितले. याचबरोबर, मी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीसांना 50 वर्ष ओळखतो. माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. चौकशी करायची असेल, सीबीआय किंवा कोणतीही एजन्सी वापरायची असेल, तर मी विरोध करणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले होते. 

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. तसेच, भाजपाच्या अनेक नेत्यांनीही ही मागणी लावून धरली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनीही सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले होते. मात्र, गृहमंत्र्यांनी ही मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर, आज सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा सीबीआय तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर, पार्थ यांनी 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले आहे. आपली मागणी न्यायालयातून मान्य झाल्याने पार्थ यांना आनंद झाल्याचे दिसून येते. 

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी कुणी काय आरोप केले, याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. माझ्यासाठी हा विषय तितका महत्त्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली, तर निश्चितच दु:ख होते, पण याची ज्या पद्धतीने चर्चा  होते, मला त्याबद्दल आश्चर्य वाटते, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच, परवा मी साताऱ्यात होतो. त्यावेळी एका शेतकऱ्यांने मला याबद्दल विचारले. त्यालाही याबद्दल आश्चर्य वाटते. त्याने सांगितले  20 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्याची मीडियात नोंदही नाही. त्यावरुन सर्वसामान्यांची भावना माझ्या लक्षात आली, असे शरद पवार म्हणाले.

टॅग्स :सुशांत सिंगपार्थ पवारशरद पवारगुन्हेगारीअनिल देशमुख