पालकांनो, लक्ष द्या! मुलांची बुद्धिमत्ता आणि एकाग्रता वाढवण्यासाठी 'या' बोर्ड गेम्सचा आहे जादूई फॉर्म्युला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:33 IST2025-09-29T13:33:31+5:302025-09-29T13:33:57+5:30
काही दिवसांपूर्वीच सरकारने ऑनलाइन गेमिंगवर बंदी घातली. अशा गेमिंगपेक्षा बुद्धिमत्तेला चालना देणाऱ्या बोर्ड गेम्सचा पर्याय सर्वोत्तम आहे.

पालकांनो, लक्ष द्या! मुलांची बुद्धिमत्ता आणि एकाग्रता वाढवण्यासाठी 'या' बोर्ड गेम्सचा आहे जादूई फॉर्म्युला!
सुनील वालावलकर
क्रीडा संघटक
काही दिवसांपूर्वीच सरकारने ऑनलाइन गेमिंगवर बंदी घातली. अशा गेमिंगपेक्षा बुद्धिमत्तेला चालना देणाऱ्या बोर्ड गेम्सचा पर्याय सर्वोत्तम आहे. शारीरिक व्यायामातून मिळणारे फायदे, त्यातून विकसित होणारी कौशल्ये व एकूणच क्रीडाविश्वात भारताचे स्थान, अशा विविध अंगाने विचार करण्याची संधी मला या स्तंभातून मिळाली. कॅरम, बुद्धिबळ, ब्रीज या खेळांतील तज्ज्ञांशी बोलल्यानंतर मात्र, बैठ्या खेळांकडे मी नव्या नजरेने बघण्यास लागलो.
मैदानी खेळांप्रमाणेच, बैठ्या खेळांमध्येही दमछाक होते. जोडीला, बौद्धिक व्यायामही पुरेपूर होतो, याची जाणीव झाल्याने बैठ्या खेळांचा नव्याने शोध घेतला. आपल्याकडील बैठ्या खेळांची यादी पत्ते, कॅरम, बुद्धिबळ आणि फारतर नवा व्यापार, सापशिडी, हौजी, मोनोपाॅली यापलिकडे फारशी पुढे सरकत नाही. परंतु, अन्य देशांत बैठ्या खेळांना जिथे बोर्ड गेम्स म्हणून ओळखले जाते, त्यामध्ये हजारो प्रकारच्या खेळांचा समावेश असतो. माझ्या मते प्रगत देशांतील नागरिकांची कल्पनाशक्ती विकसित होण्यामागे त्यांच्याकडील बोर्ड गेम्स कारणीभूत आहेत. कारण, यूरोप, अमेरिकामधल्या प्रत्येक घरामधून दहा-बारा प्रकारचे बोर्ड गेम्स हमखास असणार आणि जाणीवपूर्वकपणे कुटुंबातील प्रत्येकजण आठवड्यातील काही तास बोर्ड गेम्स खेळतातच.
भारतातील एक आघाडीचा बोर्ड गेमर सिद्धेश साळुंखे याच्या मते, बोर्ड गेम्समधील वैविध्य थक्क करणारे आहे. बोर्ड गेम्सचेही काही प्रकार आहेत. टेबल टॉप प्रकारातील खेळ म्हणजे स्प्लेंडर, कटांग, लॉकअप,
तर पार्टी बोर्ड गेम्स प्रकारात योगी, ट्रॉफीस, लव्ह लेटर आणि आरपीजी बोर्ड गेम्समध्ये डंगन अँड ड्रॅगन, वाॅर हॅमर यांसारखे खेळ प्रचलित आहेत. मैदानी खेळांएवढी शारीरिक हालचाल बैठ्या खेळांमध्ये होत नसली, तरी बौद्धिक श्रम मात्र तेवढेच होतात. बोर्ड गेम्स खेळल्याने खेळाडूंची विचारशक्ती, स्मरणशक्ती, निर्णय क्षमता आणि एकाग्रता वाढीस लागल्याचे सिद्धेश सांगतात.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
बोर्ड गेम्सच्याही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत असतात. त्यामध्ये सोशल डिडक्शन अँड डिसेप्शन नावाचा प्रकार खूप तेजीत आहे. यातील काही खेळांची नावे मजेशीर आहेत. उदा. ब्लड ऑन क्लाॅक टाॅवर, ॲव्हलाॅन, व्हेअर बाॅल, सिक्रेट हिटलर. बोर्ड गेम्सचे अभ्यासक नील पाटील स्वत: एक पर्यटन व्यावसायिक असल्यामुळे अनेक देशांमधल्या बोर्ड गेम्सचा त्यांना अनुभव आहे. त्यांच्या मते, बोर्ड गेम्स म्हणजे, एका परीने संस्कृतीचा असतो. प्रत्येक देशाच्या संस्कृतीनुसार, तिथले खास बोर्ड गेम्स खेळले जातात. हल्ली बोर्ड गेम्स जरी मोबाईलवरही खेळता येत असले, तरी हे खेळ प्रत्यक्षात मित्र-मंडळींसह खेळण्याची मजा औरच आहे. यूरोपात काही शहरांमधून बोर्ड गेम्स कॅफेसुद्धा उदयास आले आहेत, जिथे गेम्स तयार करणाऱ्या कंपन्या नवीन खेळांच्या चाचण्या करतात, असे नील यांचे निरीक्षण आहे.
भारतापेक्षा परदेशात जास्त लोकप्रियता
भारतापेक्षा बोर्ड गेम्सची लोकप्रियता परदेशात जास्त असल्यामुळे बरेचशे गेम्स परदेशी कल्पनांवर आधारित असतात. तथापि, अलिकडच्या काळात भारतीयांनीही बोर्ड गेम्सची निर्मिती केली असून त्यांना जागतिक स्तरावर मोठी मागणी आहे. उदा. शासन, खुर्ची, सरकार, योगी, डब्बेवाला हे सर्व भारतीय बनावटीचे बोर्ड गेम्स खेळाडूंना आकर्षित करत असतात. आजच्या वेगवान जीवन शैलीत जिथे मोबाईल स्क्रीन आयुष्यावर वर्चस्व गाजवत आहे, अशावेळी बोर्ड गेम्स नातेसंबंध मजबूत करतात आणि त्यातून मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.