Paper QR ticket instead of plastic on Metro-1; Time savings | मेट्रो-१वर प्लास्टीकऐवजी पेपर क्यूआर तिकीट; वेळेची होणार बचत

मेट्रो-१वर प्लास्टीकऐवजी पेपर क्यूआर तिकीट; वेळेची होणार बचत

मुंबई : घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्लास्टीकच्या टोकनऐवजी पेपर क्यूआर तिकीट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या पेपर क्यूआर तिकिटामुळे सध्याच्या टोकन तिकीट पद्धतीच्या तुलनेत दुप्पट वेगाने तिकिटे देणे शक्य होणार असल्याने मेट्रो प्रवाशांच्या मौल्यवान वेळेची बचत होणार आहे. त्यामुळे ३१ जानेवारीपर्यंत प्लास्टीकच्या टोकनचा वापर बंद होऊन पूर्णपणे पेपर क्यूआर तिकीट पद्धती सुरू होईल, असे एमएमओपीएलतर्फे सांगण्यात आले आहे.

घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो-१ मार्गिका अंधेरी येथे पश्चिम आणि घाटकोपर तेथे मध्य रेल्वे मार्गिकांना जोडत असल्याने या मेट्रो-१ मार्गिकेवरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मुंबई मेट्रो वन ही मुंबईतील पेपर क्यूआर तिकीट आणणारी पहिली वाहतूक यंत्रणा ठरली आहे. सध्या पेटीएम आणि रिडलर अ‍ॅप्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या मोबाइल क्यूआर तिकीटचा हा विस्तार आहे. आता मेट्रोचे प्रवासी मुंबई मेट्रो वनच्या सर्व तिकीट काउंटरवर क्यूआर तिकिटे खरेदी करू शकतात. पेपर क्यूआर तिकीट उत्पादनाची रचना रिलायन्स मेट्रो वनच्या अंतर्गत तांत्रिक टीमने गेल्या सहा महिन्यांमध्ये विविध चाचण्या करून केली आहे.

पेपर क्यूआर तिकीट या नवीन तंत्रज्ञानामुळे मुंबई मेट्रो वनच्या तिकीट कर्मचाऱ्यांना सध्याच्या टोकन तिकीट पद्धतीच्या तुलनेत दुप्पट वेगाने तिकिटे देणे शक्य होईल. त्यामुळे मेट्रो प्रवाशांच्या मौल्यवान वेळेची बचत होणार आहे. पेपर क्यूआर तिकिटे जारी केलेल्या यंत्रणा संक्षिप्त, सुयोग्य आणि अत्यंत वेगवान आहेत. त्यामुळे त्या मागणीनुसार विविध ठिकाणांसाठी वापरल्या जाऊ शकतात. पेपर क्यूआर तिकिटावर एखाद्या स्थानकापासून ज्या स्थानकापर्यंत प्रवास करायचा असेल त्याबाबतचा तपशील, भाडे, जारी केल्याची तारीख आणि वेळ छापण्यात येणार आहे. या यंत्रणेतून तिकिटे थर्मल पेपरवर छापण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तिकीट वापरण्याची पद्धत
तिकीट काउंटरवरून क्यूआर तिकिटे खरेदी केल्यावर सुरक्षा तपासणीनंतर एएफसीच्या (आॅटोमेटेड फेअर कलेक्शन) वर लावलेल्या काचेवर क्यूआर तिकीट स्कॅन करता येणार आहे. ही तपासणी यशस्वीरीत्या झाल्यावर एएफसी गेट प्रवेशासाठी उघडेल, यानंतर प्रवाशांना बाहेर पडताना स्कॅन करण्यासाठी तिकीट जवळ ठेवावे लागेल. गंतव्य स्थानकावर प्रवाशांना निकास एएफसी गेटवर तोच क्यूआर पुन्हा स्कॅन करावा लागेल.

Web Title: Paper QR ticket instead of plastic on Metro-1; Time savings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.