पल्लवी विकमसीच्या मोबाइलचा ‘सीडीआर’ तपासणार, मृत्यूचा तपास मुंबई पोलिसांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 05:33 AM2017-10-07T05:33:04+5:302017-10-07T05:33:24+5:30

‘द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडिया’चे (आयसीएआय) अध्यक्ष नीलेश विकमसी यांची मुलगी पल्लवी (२१) हिचा मृत्यू लोकलखाली येऊन झाला असला तरी या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करणार आहेत.

Pallavi Vikassee's mobile to investigate 'CDR', investigating death to Mumbai Police | पल्लवी विकमसीच्या मोबाइलचा ‘सीडीआर’ तपासणार, मृत्यूचा तपास मुंबई पोलिसांकडे

पल्लवी विकमसीच्या मोबाइलचा ‘सीडीआर’ तपासणार, मृत्यूचा तपास मुंबई पोलिसांकडे

Next

मुंबई : ‘द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडिया’चे (आयसीएआय) अध्यक्ष नीलेश विकमसी यांची मुलगी पल्लवी (२१) हिचा मृत्यू लोकलखाली येऊन झाला असला तरी या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करणार आहेत. पल्लवीचा मोबाइल अद्याप सापडलेला नाही. तरीही ‘सीडीआर’द्वारे अधिक माहिती मिळविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी शुक्रवारी दिली. तसेच घटनेच्या दिवशी ती फक्त मोबाइल घेऊन बाहेर पडल्याचे चौकशीत समोर आल्याने तिने आधीच आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
परळच्या ‘कल्पतरू’ इमारतीत पल्लवी आई-वडील, भाऊ आणि वहिनीसह राहायची. चर्चगेटच्या एच. आर. कॉलेजमध्ये शिकणारी पल्लवी ‘ओअ‍ॅसिस काऊन्सिल अ‍ॅण्ड अडव्हायजरी’मध्ये इंटर्नशीप करीत होती. बुधवारी नेहमीप्रमाणे ती घराबाहेर पडली; मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. गुरुवारी तिच्या मृतदेहाची ओळख पटली. बुधवारी सायंकाळी ६.४०च्या सुमारास करी रोड ते परळदरम्यान तिचा लोकलखाली येऊन मृत्यू झाला होता. तिने आत्महत्येचे पाऊल का उचलले? याचा शोध पोलीस घेत आहेत.
बुधवारी पल्लवी साडेपाचच्या सुमारास कार्यालयातून निघाल्याचे तेथील कर्मचाºयांचे म्हणणे आहे. घटनेच्या दिवशी ती फक्त मोबाइल घेऊन बाहेर पडली होती. महत्त्वपूर्ण कागदपत्रे, पाकीट घरी ठेवल्याचे समोर येत आहे. त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचे आधीच ठरवले होते, असाही पोलिसांचा अंदाज आहे. सायंकाळी मृत्यूपूर्वी पल्लवीच्या मोबाइलवरून वहिनी शरयू हिच्या मोबाइलवर ‘नो वन इज रिस्पॉन्सिबल’ असा मेसेज आल्याने कुटुंबीयांची तारांबळ उडाली. त्यांनी तिच्या मोबाइलवर त्वरित कॉल केला मात्र तिचा फोन बंद झाला होता.
पल्लवीचा मोबाइल पोलिसांना सापडलेला नाही. तो कोणीतरी उचलून नेल्याची शक्यता आहे. तिचे शेवटचे मोबाइल लोकेशन करी रोड आले होते. तिचा मोबाइल सीडीआर काढण्यात येणार आहे. त्यातून घटनेच्या दिवशी तिने कुणाशी संपर्क साधला, याची माहिती मिळाल्यानंतर त्या व्यक्तींची चौकशी होईल, असे पोलिसांनी सांगितले. पल्लवीच्या एका नातेवाइकाचा जबाब नोंदविला आहे. शनिवारपासून अन्य नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, सहकारी आदींचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू होणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

Web Title: Pallavi Vikassee's mobile to investigate 'CDR', investigating death to Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.