नौदलाच्या आक्रमणामुळे पाकिस्तानने टाकली नांगी; व्हाईस ॲडमिरल स्वामिनाथन यांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 11:57 IST2025-12-03T11:54:16+5:302025-12-03T11:57:18+5:30
१० वर्षांत नौदलाच्या ताफ्यात ४० युद्धनौका व पाणबुड्यांचा समावेश झाला आहे. सध्या १३८ युद्धनौका ताफ्यात असून लवकरच हा आकडा १५० वर जाण्याची शक्यता आहे.

नौदलाच्या आक्रमणामुळे पाकिस्तानने टाकली नांगी; व्हाईस ॲडमिरल स्वामिनाथन यांचे विधान
मुंबई : आक्रमक कारवाईसाठी सज्ज असलेले भारतीय नौदल हे ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानच्या युद्धविरामाचे महत्त्वाचे कारण ठरले, असे प्रतिपादन नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी मंगळवारी केले.
नौदल दिनानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अत्यंत कमी कालावधीत नौदलाच्या ३० युद्धनौका व पाणबुड्यांची फ्रंटलाइन युद्धनौकांची तुकडी मक्रान किनाऱ्याजवळ लढाईस सज्ज होती, असेही ते म्हणाले.
एप्रिल महिन्यात यशस्वी शस्त्रचाचण्या
नौदलाने एप्रिल महिन्यात यशस्वी शस्त्रचाचण्या केल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानच्या नौदलाला त्यांच्या किनाऱ्याजवळच थांबण्यास भाग पडले, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला व्हाईस ॲडमिरल राहुल गोखले व अंकुर शर्मा, रिअर ॲडमिरल अजय पटनी व शंतनू झा उपस्थित होते.
चीनच्या नौदल क्षमतेत होत असलेल्या वेगवान वाढीचा उल्लेखही त्यांनी केला. तुर्कस्तान व पाकिस्तानच्या वाढत्या सहकार्यामुळे निर्माण झालेल्या सुरक्षेच्या चिंतेकडेही स्वामीनाथन यांनी लक्ष वेधले.
त्या दुर्घटनेची चौकशी पूर्ण
गतवर्षी १८ डिसेंबरला स्पीडबोटीची चाचणी सुरू असताना बोट नियंत्रण सुटल्याने गेट वे ऑफ इंडियाजवळ नीलकमल या प्रवासी फेरीबोटीला धडकली होती. याची चौकशी पूर्ण झाली असून अहवाल नौदल मुख्यालयाकडे पाठवला आहे. अपघात रोखण्यासाठी मानक प्रणाली तयार केल्याचे स्वामीनाथन म्हणाले.
२०३० पर्यंत २०० युद्धनौका ताफ्यात; ५१ युद्धनौकांची निर्मिती सुरू
गेल्या १० वर्षांत नौदलाच्या ताफ्यात ४० युद्धनौका व पाणबुड्यांचा समावेश झाला आहे. यावर्षी ११ युद्धनौका समाविष्ट झाल्या असून देशातील विविध शिपयार्डमध्ये ५१ युद्धनौकांची निर्मिती सुरू असल्याची माहिती कृष्णा स्वामीनाथन यांनी दिली.
सध्या १३८ युद्धनौका ताफ्यात असून लवकरच हा आकडा १५० वर जाण्याची शक्यता आहे. २०३० पर्यंत २०० युद्धनौका ताफ्यात आणण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे सर्व ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाशी सुसंगत असून स्वदेशीकरण, नवे तंत्रज्ञान, ड्रोनचा समावेश आणि तीनही सैन्य दलांमधील समन्वय वाढवण्यावर भर दिला जात असल्याचेदेखील स्वामीनाथन यांनी स्पष्ट केले.