Vijaypat Singhania Death: पद्मभूषण डॉ. विजयपत सिंघानिया यांचे निधन; उद्योगजगतावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 07:07 IST2026-03-29T07:07:27+5:302026-03-29T07:07:48+5:30
Vijaypat Singhania Demise: विजयपत कैलाशपत सिंघानिया यांच्या निधनामुळे उद्योग, समाजकारण आणि विमानचालन क्षेत्रात मोठी पोकळी

Vijaypat Singhania Death: पद्मभूषण डॉ. विजयपत सिंघानिया यांचे निधन; उद्योगजगतावर शोककळा
मुंबई : पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित, रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योगजगतामधील दिग्गज व्यक्तिमत्त्व डॉ. विजयपत कैलाशपत सिंघानिया यांचे शनिवारी सायंकाळी मुंबईत निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे उद्योग, समाजकारण आणि विमानचालन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
डॉ. सिंघानिया हे दूरदृष्टी असलेले उद्योगपती, समाजहितासाठी कार्य करणारे व्यक्तिमत्त्व आणि प्रेरणादायी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. १९८० ते २००० या काळात त्यांनी रेमंड समूहाचे नेतृत्व केले. रेमंड ब्रँडला त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली.
विमानचालनातही मोठी कामगिरी
व्यवसायासोबतच डॉ. सिंघानिया यांना विमानचालनाची विशेष आवड होती. हॉट एअर बलूनद्वारे सुमारे ६९,००० फूट उंची गाठत त्यांनी जागतिक विक्रम प्रस्थापित केला. तसेच मायक्रोलाइट विमानातून लंडन ते दिल्ली असा ऐतिहासिक प्रवास करत त्यांनी धाडसी विक्रम नोंदवला. या कामगिरीबद्दल त्यांना ‘टेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
आज अंत्यसंस्कार
सिंघानिया यांच्या निधनाची माहिती कुटुंबीयांनी दिली असून, सोशल मीडियावर “ओम शांती” अशा शब्दांत श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली आहे. अंत्यदर्शनासाठी रविवारी दुपारी १.३० वाजता हॅवेली, एल. डी. रुपारेल मार्ग येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता चंदनवाडी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
वैयक्तिक जीवन व वारसा
प्रसिद्ध सिंघानिया कुटुंबातील सदस्य असलेल्या डॉ. सिंघानिया यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग उद्योगवृद्धी आणि नव्या संधी निर्माण करण्यासाठी दिला.
२०१५ मध्ये त्यांनी रेमंड समूहातील आपला हिस्सा मुलगा गौतम सिंघानिया यांना हस्तांतरित केला होता. त्यानंतर कुटुंबातील वादही चर्चेत राहिले. त्यांच्या पश्चात मुलगा गौतम सिंघानिया यांच्यासह कुटुंबीय असा परिवार आहे.
अनेक सन्मानांनी गौरव
भारत सरकारने त्यांच्या उद्योग, समाजकार्य आणि साहसी कामगिरीच्या योगदानासाठी २००६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. भारतीय वायुसेनेने त्यांना मानद ‘एअर कमोडोर’ पद बहाल केले होते. तसेच ते मुंबईचे ‘शेरिफ’ म्हणूनही कार्यरत होते.