भारताबाहेर मराठीचा डंका परत जोमाने वाजू लागेल - अभ्यंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 01:10 AM2020-02-27T01:10:35+5:302020-02-27T01:10:46+5:30

मराठी अस्मिता परत जागृत होऊन भारताबाहेर मराठीचा डंका परत जोमाने वाजू लागेल, असा विश्वास ‘ग्रंथ तुमच्या दारी’चे मुंबईचे मुख्य समन्वयक डॉ. महेश अभ्यंकर यांनी व्यक्त केला.

Outside India, Marathi sting will be played again - Abhyankar | भारताबाहेर मराठीचा डंका परत जोमाने वाजू लागेल - अभ्यंकर

भारताबाहेर मराठीचा डंका परत जोमाने वाजू लागेल - अभ्यंकर

Next

- मनोहर कुंभेजकर 

मुंबई : मराठी भाषा जिवंत राहावी, तिचे संवर्धन व विकास व्हावा. लोकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी व वृद्धिंगत व्हावी, या ध्येयाने प्रेरित असलेला ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा उपक्रम वाचक वर्ग जोडत आहे. या उपक्रमामुळे साहित्य क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात एक सकारात्मक संदेश जात आहे. उपक्रमाद्वारे मराठी अस्मिता परत जागृत होऊन भारताबाहेर मराठीचा डंका परत जोमाने वाजू लागेल, असा विश्वास ‘ग्रंथ तुमच्या दारी’चे मुंबईचे मुख्य समन्वयक डॉ. महेश अभ्यंकर यांनी व्यक्त केला.

‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेची सुरुवात कशी झाली?
कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे माजी विश्वस्त विनायक रानडे यांनी वाचकांना त्यांच्या घराजवळ उत्तम व वाचनीय पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या ११ वर्षांपूर्वी केलेल्या निश्चयातून ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या योजनेचा उगम झाला. दुबई, ओमान, बहारिन, अमेरिका, नेदरलँड आणि जपान येथील वाचकांना पुस्तके वाचनासाठी उपलब्ध झाली आहेत.

केंद्र कुठे आहेत?
कुलाबा ते भार्इंदर १५० ग्रंथपेट्या. घर, सोसायटी आॅफिस, शाळा, मंदिर, रुग्णालय, दवाखाना, आश्रम, तुरुंग, उद्यान, सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळ, पोलीस ठाणे इत्यादी ठिकाणी वाचक केंद्रे आहेत. मालाड, गोरेगाव, कांदिवली, भार्इंदर, अंधेरी, वांद्रे, दादर, कुलाबा, देवनार, कुर्ला, गोवंडी, पवई, सायन, वडाळा येथे केंद्र आहेत.

योजनेचे गमक कशात आहे?
ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. रंगनाथन यांनी मांडलेल्या पाच परिमाणांचे पालन होत आहे. ते पाच नियम म्हणजे; ग्रंथ उपयोगासाठी आहेत. ग्रंथाला वाचक हवा. वाचकाला ग्रंथ उपलब्ध व्हायला हवा. वाचकाचा वेळ वाचायला हवा. वाचकांमध्ये वाढ व्हायला हवी.

योजना मुंबईत यशस्वी का झाली?
मुंबई शहर गतिमान शहर आहे. चांगल्या गोष्टी लवकर आत्मसात करते. जवळपास वाचनालय नसणे, कामाच्या व्यस्ततेमुळे, वेळेअभावी किंवा वाढत्या वयोमानामुळे, शारीरिक त्रासामुळे, अशा कारणांमुळे वाचक वाचनालयात पोहोचू शकत नाहीत. त्यांना ही योजना एक वरदान ठरत आहे.

वाचनाचे महत्त्व काय?
ज्ञान मिळविण्याचे साधन म्हणजे पुस्तके. वाचनामुळे जीवनात नवीन कल्पना सुचतात. सामाजिक कौशल्य विकसित करता येतात. तणाव आणि एकाकीपणा दूर होतो. कंटाळवाणेपणातून सुटका होते. पुस्तक रोग्याच्या वेदनेवर फुंकर घालते. वाचन हे आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आध्यात्मिक प्रगतीसाठी पोषक ठरते. वाचनाने माणूस चिंतनशील बनतो.

Web Title: Outside India, Marathi sting will be played again - Abhyankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.