आमचे विकासाचे राजकारण; महापौर महायुतीचाच होणार: एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 05:55 IST2026-01-13T05:55:31+5:302026-01-13T05:55:56+5:30
परिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे

आमचे विकासाचे राजकारण; महापौर महायुतीचाच होणार: एकनाथ शिंदे
मुंबई : मुंबईमध्ये आम्ही हे करून दाखविले, असे काही होर्डिंग लावले आहेत. महायुतीने केलेल्या विकासकामांचे श्रेय घेणारी नवीन चोर टोळी निर्माण झाली आहे. पालिकेची सत्ता असताना तुम्ही काही केले नाही तर फक्त खाऊन दाखवले. दिवसभर नेटफ्लिक्स आणि निवडणूक आली की पॉलिटिक्स असे यांचे धोरण आहे. आता भावनिक भाषणांचे नव्हे तर विकासाचे राजकारण अपेक्षित आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ती तशीच दिसली पाहिजे, हा आमचा ठाम निर्धार आहे. त्यासाठी परिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूवर टीका केली.
शिवाजी पार्क येथील महायुतीच्या सभेत ते म्हणाले, विरोधक नेहमीप्रमाणे शिवीगाळ, टीका, आरोप करतात. त्यांच्याकडे ना मुद्दे आहेत, ना कामाचा लेखाजोखा. मात्र, आम्ही कामांतून उत्तर देतो. मराठी माणसाच्या नावाने गळे काढणाऱ्यांना मुंबईशी, मराठी माणसाशी देणे-घेणे नाही. वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचे सांगता मग २० वर्षांपूर्वी एकत्र का आला नाहीत? तेव्हा महाराष्ट्र छोटा होता का? बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली नाही तेव्हा तुमचा अहंकार मोठा होता का? असा टोलाही त्यांनी लगावला.
विकासकामांचा उल्लेख
मुंबईतील विकासकामांचा शिंदे यांनी तपशीलवार उल्लेख केला. २० हजार इमारतींना ओसी देण्याचा निर्णय, पागडी घरांना दिलासा, कोस्टल रोड, खड्डेमुक्त मुंबई, दोन टप्प्यांत सर्व रस्ते सिमेंटचे, धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची योजना, मोठ्या झोपडपट्ट्यांचा क्लस्टर पुनर्विकास, १० ते १२ हजार गिरणी कामगारांना घरे, तर एक लाख कामगारांना मुंबई-एमएमआरमध्ये घरे देणार आहोत. तुमच्या काळात मराठी माणूस बाहेर फेकला गेला, हे कुणाचे अपयश आहे. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
'जब लगती है हरी पत्ती'
बाळासाहेबांची भूमिका शिंदेसेनेने घेतल्यावर विरोधक टीका करतात. पण, तुमच्या भावाचे नगरसेवक ज्यांनी फोडले तेव्हा किती दक्षिणा घेतली होती. ज्यांची नावे घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यांनाच घरी जेवायला बोलावता. त्यांच्या घरी तुमची मुले नाचतात. जब लगती है हरी पत्ती, तेव्हा... यांना आठवतात उद्योगपती. आम्ही 'फक्त डेव्हलपमेंट नो सेटलमेंट' असे धोरण ठेवले आहे. आता भावनेचे नाही तर विकासाचे राजकारण अपेक्षित आहे, असे शिंदे म्हणाले.