"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 11:09 IST2025-09-26T11:07:16+5:302025-09-26T11:09:52+5:30
हा देश हिंदूंचा आहे. इथे सर्वधर्म समभाव चालणार नाही. पहिले हिंदू हित मग बाकीच्यांना मोजले जाईल असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं.

"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
मुंबई - महाराष्ट्रातलं सरकार हिंदूंच्या मतांनी निवडून आले आहे. आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही. हिंदू मतांमुळे आज आम्ही आमदार, मंत्री झालो असं विधान भाजपा मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. मुंबईतील मानखुर्द परिसरात ते बोलत होते.
यावेळी नितेश राणे म्हणाले की, हा देश हिंदूराष्ट्र आहे, इथे सर्वधर्म समभाव चालणार नाही. याठिकाणी आधी हिंदूंचे हित पाहिले जाईल. त्यानंतर बाकीचे...महाराष्ट्र सरकार हिंदुत्ववादी विचारांचे आहे. तुम्ही तुमचे सण शांततेत करा, आम्ही आमचे सण उत्साहात साजरे करू, कुणीही आमच्याकडे वाकड्या नजरेने बघायचे नाही. आमच्या दुर्गामातेचे विटंबना करणाऱ्यांना जिथे कुठे लपले असतील, त्यांना शोधून अटक केली जाईल. मुंबईत कुणीही वातावरण खराब करायचा प्रयत्न करत असेल तर आमचे देवाभाऊंचे सरकार कुणालाही सोडणार नाही, हे तुमच्या आकाला सांगा असंही त्यांनी सांगितले.
तसेच आमच्या देवीची विटंबना कुणी केली तर त्याला सोडणार नाही. ज्या जिहादींनी हे कृत्य केलंय ते जास्त दिवस २ पायावर चालणार नाही हा शब्द आहे. आम्ही आमचे सण कुणालाही न दुखावता साजरे करत असू तर कुणाला हिरव्या मिरच्या लागण्याची गरज नाही. या देशात सर्वात आधी हिंदूंचे हित पाहिले जाईल, त्यानंतर बाकीच्यांचे हित बघितले जाईल. हा देश हिंदूंचा आहे. इथे सर्वधर्म समभाव चालणार नाही. पहिले हिंदू हित मग बाकीच्यांना मोजले जाईल. आमच्या देवीची विटंबना झाल्यानंतर जिहादींना समजवणारे कुठे लपले? असा सवाल भाजपा मंत्री नितेश राणे यांनी केला.
दरम्यान, नवरात्र उत्साहात साजरी करा, जर कुणी परवानगी नाकारली तर आम्हाला फोन करा. तुमच्या घरापर्यंत आम्ही परवानगी घेऊन येऊ असंही आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिले. गरबास्थळी फक्त हिंदूनाच प्रवेश द्या, त्यांची ओळखपत्रे तपासा अशी मागणी विश्व हिदू परिषदेने केली होती. त्यालाही नितेश राणे यांनी समर्थन दिले.