Join us  

Video : 'आमचं हिंदुत्व कालही होतं, आजही आहे अन् उद्याही राहील'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 4:06 PM

शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत

मुंबई - आयुष्य हे एक रंगभूमी आहे. मी नशिबानं इथे आलोय आणि मायबाप जनतेनं मला इथे बसवलंय. ‘मी येईन’, असं कधीही म्हणालो नव्हतो तरी मला यावं लागलं. तुम्ही माझ्यासोबत असता तर आज मी घरी बसून टीव्हीवर हे कामकाज पाहिलं असतं, असे चिमटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी विधानसभेत माजी मुख्यमंत्री आणि नवे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काढले. यावेळी भाषणा करताना, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्याचही स्पष्टीकरण दिलं. 

शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसेच, पत्रकारांकडूनही उद्धव ठाकरेंना सेक्युलिरीज आणि हिंदुत्त्वासंदर्भातील प्रश्नांची विचारणा होतेय. मात्र, विधानसभा सभागृहात सर्वपक्षीय नेत्यांसमोर आपल्या हिंदुत्वाचा पुनर्उच्चार केला. ''आमचे हिंदुत्व कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहील, पण आमच्या हिंदुत्वात शब्द पाळणं येतं. जय श्रीराम म्हणायचं अन् दिलेलं वचन तोडायचं हे माझं हिंदुत्व नाही,'' अशी कोपरखळीही उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावली.

हिंदुत्व कधीही सोडणार नाही

तसेच, फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर ठाकरे यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. अभिनंदन करतानाच त्यांनी निवडणूक निकालापासून भाजपबद्दल मनात असलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. फडणवीस यांचा त्यांनी मित्र म्हणून उल्लेख केला. समोर तुमच्यासारखे मित्र आहेत. हो! तुमच्यासोबतची मैत्री मी कधीही लपवून ठेवलेली नाही आणि त्यात अंतरही पडणार नाही, मी गेल्या पाच वर्षांत तुमच्याकडून खूप शिकलो, या ठाकरे यांच्या विधानाने गेल्या महिनाभरातील कटूता विसरून राज्यहितासाठी विरोधी पक्षाशी चांगले संबंध ठेवण्याची त्यांची मानसिकता असल्याचे दिसले.

तुमच्यासोबत होतो तेव्हा मी कधीही दगा दिला नाही. चांगल्या कामांआड आलो नाही आणि कटकारस्थानही केलं नाही. मी शिवसेनेच्या सर्व आमदारांना सांगितले होते की, काळोखात काही करायचे नाही. मध्यरात्री खलबतं करायची नाहीत, असे सांगत ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करून सकाळीच सरकार स्थापन केल्याबद्दलही चिमटे काढले. मला शेतकऱ्यांचा सातबाराच कोरा करायचा नाही, त्यांना केवळ कर्जमुक्त करायचे नाही तर चिंतामुक्तही करायचे आहे. निसर्गाचा लहरीपणा, सरकारमध्ये कोण, विरोधात कोण याच्या महिन्याभरातील लहरीचे तडाखे सर्वांनाच बसले आहेत. आज आपण एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी आलो नसून त्यासाठी विरोधकांनी सहकार्य करावे आणि त्यासाठी रात्रीही बसावे लागले तर आपली तयारी असेल, असे ठाकरे म्हणाले. ‘मी आपल्याला विरोधी पक्षनेता म्हणणार नाही, आपण एका जबाबदार पक्षाचे नेते आहात मी आपल्याला विरोधक मानत नाही, अशी साद त्यांनी फडणवीस यांना घातली. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसदेवेंद्र फडणवीस